ग्रामपंचायतीकडून अरेरावी, रहिवासी हैराण
मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरातील ग्रामपंचायतींना ‘एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्यास मज्जाव केल्याने ग्रामपंचायत हद्दीतील कचरा आता इमारतींचे कोपरे, चौकांमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारचा कचरा आजदे ग्रामपंचायत हद्दीत आर्चिस इमारतीसमोर गेल्या काही दिवसांपासून टाकण्यात येत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.
आर्चिस इमारतीच्या बाजूला साईबाबा मंदिर आहे. या भागात नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे आर्चिस इमारतीच्या बाजूला कचरा टाकण्यास नागरिकांना प्रतिबंध करावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी आजदे ग्रामपंचायतीत केली, त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने ‘तुम्ही मालमत्ता कर भरला आहे का? त्याची पावती दाखवा, मगच कचरा विषयावर बोला’, असे प्रश्न करून रहिवाशांना निरुत्तर केले. रहिवाशांनी मालमत्ता कराची पावती दाखवल्यानंतर कर्मचाऱ्याने समाधान झाल्याचे दाखवून कचरा टाकण्यास नागरिकांना प्रतिबंध केला जाईल असा आविर्भाव आणला. मात्र तरीही इमारतीच्या कोपऱ्यावर नागरिकांकडून कचरा टाकण्याचे काम सुरूच आहे. कचऱ्यामुळे या भागात डास, मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. वृद्ध, रुग्णांना या घाणीचा सर्वाधिक त्रास होत आहे.
या चौकात कचरा टाकू नये, असा फलक लावून त्याचीही दखल नागरिकांकडून घेण्यात येत नाही. ग्रामपंचायत हद्दीतील गटारांमधील गाळ, कचरा याच ठिकाणी ग्रामपंचायत सफाई कामगार आणून टाकतात. ते कामगारही आम्हाला कचरा टाकण्यास कोठे जागा नाही अशी उलट उत्तरे देऊन कचरा टाकण्याचे समर्थन करीत आहेत. या प्रकरणी दाद कोठे मागायची, या विवंचनेत रहिवासी आहेत. 

Story img Loader