दोन चाळींमधील कचऱ्याने भरलेल्या चिंचोळ्या घरगल्ल्या.. त्यातूनच जाणाऱ्या जलवाहिन्यांमधील दूषित पाणीपुरवठा.. दरुगधी.. घुशी, डास, उंदीर आदींची स्वच्छंद भ्रमंती, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न.. इतका त्रास होत असतानाही चाळकऱ्यांचे हात मात्र उष्टे खरकटे टाकण्यासाठी सदैव खिडकीतून बाहेर पडताना गिरगाव आणि आसपासच्या परिसरात दिसतात. परिणामी घर स्वच्छ आणि परिसर अस्वच्छ हे नेहमीचेच दृश्य. मात्र आता यावर ‘गार्बेज शूट’चा तोडगा काढण्यात आला आहे.
घरगल्ल्या चिंचोळ्या असल्याने तेथील साफसफाई करण्यास पालिकेचे सफाई कामगार तयार नसतात. त्यातच स्वच्छतागृहांचे पाइप फुटून ओघळणाऱ्या घाणेरडय़ा पाण्याचीही भर पडते. कचऱ्याचे ढीग आणि साठलेल्या घाणेरडय़ा पाण्याखालून जात जलवाहिन्या चाळींमधील घराघरांत पोहोचल्या आहेत. गंजलेल्या जलवाहिन्यांमध्ये गटारातील दूषित पाणी जाते आणि मग चाळकऱ्यांना दरुगधीयुक्त काळ्या-पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
चाळकऱ्यांची या समस्येतून सुटका काढण्यासाठी घरगल्ल्यांमध्ये ‘गार्बेज शूट’ योजना राबविण्याचा निर्णय स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी घेतला आहे. आतापर्यंत केनेडी ब्रिजजवळील सैफी मंझिल (सोमण बिल्डिंग), तात्या घारपुरे पथावरील कानजी खेतजी चाळ, खाडिलकर मार्गावरील कानजी खेतजी चाळ, जगन्नाथ शंकर शेठ रोडवरील मापला महाल, भीमराव हाऊस येथे गार्बेज शूट उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रार्थना समाज येथील श्याम सदन आणि डी. डी. साठय़े मार्गावरील वसंत विलास इमारतीजवळ गार्बेज शूट बसविण्याचे काम सुरू आहे. गार्बेज शूट बसविल्यानंतर या इमारतींमधील रहिवाशांनी खिडकीतून रस्त्यावर वा घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकणे बंद केले आहे. गार्बेज शूटमधून टाकलेला कचरा थेट कचराकुंडीत गोळा होत असून सफाई कामगारालाही कचरा गोळा करून गाडीपर्यंत पोहोचविणे सोपे झाले आहे.  घरगल्ल्यांमधील साफसफाईच्या समस्येवर गार्बेज शूट बसवून ती सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सुरेंद्र बागलकर म्हणाले.
गार्बेज शूट म्हणजे काय?
चाळीच्या उंचीची पत्र्याची बऱ्यापैकी रुंद अशी मोठी चिमणी उभारण्यात येते. कचरा टाकण्यासाठी प्रत्येक मजल्यावर या चिमणीवर व्यवस्था करण्यात येते. चिमणीच्या खाली एक कचराकुंडी ठेवलेली असते. वरच्या मजल्यांवरून गार्बेज शूटमध्ये टाकलेला कचरा थेट खालच्या कचराकुंडीत जमा होतो. कचऱ्याची गाडी आल्यानंतर सफाई कामगार गार्बेज शूटखालील कचराकुंडी काढून तिकडे दुसरी कचराकुंडी बसवितो. यामुळे सफाई कामगाराचे कामही हलके झाले आहे.

Story img Loader