सोलापूर शहरातील दररोज साचलेला कचरा उचलण्याच्या कामाचे महापालिकेने खासगीकरण केले असले तरी प्रत्यक्षात दररोज कचरा उचलला जात नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढत असल्याचे दिसून येते. या प्रश्नावर पालिका प्रशासनही बेफिकीर असल्यामुळे संतप्त झालेले बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी चक्क टनभर कचरा उचलून महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर आणून टाकला. त्यांच्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासन किमान दिवाळीत तरी जागे होईल, अशी आशा बसपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
आयुक्त अजय सावरीकर हे तीन आठवडय़ांच्या रजेवर निघून गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार मुख्य लेखापाल अशोक जोशी हे सांभाळत आहेत. या पाश्र्वभूमीवर नगरसेवक चंदनशिवे यांनी वाढत्या कचऱ्याबद्दल संताप व्यक्त करीत आगळे वेगळे आंदोलन केले.
चंदनशिवे यांनी आयुक्तांच्या दालनासमोर कचरा टाकून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला असून यापूर्वी अशाच प्रकारचे आंदोलन भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले होते. पालिकेत कचरा आणून टाकण्याची ही दुसरी वेळ आहे.
दिवाळी सण तोंडावर असताना शहरात कचरा उचलला जात नाही. कचरा उचलण्यासाठी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला मक्ता देण्यात आला आहे. मात्र मक्तेदाराकडून कचरा उचलण्याचे काम सक्षमपणे होत नाही. उलट, या खासगीकरणाच्या कामातून-‘कचऱ्या’तून ‘सोने’ काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा
आरोप नगरसेवक चंदनशिवे यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा