मातीचा वापर न करता फक्त ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खतावर बाग फुलवण्याचा उपक्रम अहिल्यादेवी प्रशालेतील विद्यार्थिनींनी केला असून शाळेच्या गच्चीवर कुंडय़ा, पिंप, शीतपेयांच्या बाटल्या यांमधून ही बाग फुलली आहे.
साचणारा ओला कचरा आणि त्यापासून सगळीकडे पसरणारी दरुगधी यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी मुलींच्या प्रशालेने उत्तर शोधले आहे. ओल्या कचऱ्याच्या वापरातून शाळेच्या गच्चीवर फळा-फुलांची बाग तयार करण्यात आली आहे. मात्र, या प्रयोगामध्ये नारळाच्या शेंडय़ा, पालेभाज्यांची देठे, फळांच्या साली अशा कचऱ्याचा वापर होत असूनही येथे दरुगधी पसरत नाही.
शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी १ ऑक्टोबरपासून या प्रयोगाची सुरूवात केली. या विद्यार्थिनी रोज घरातील ओला कचरा घेऊन येतात, त्या कचऱ्याचा या उपक्रमामध्ये खत म्हणून वापर केला जातो. झाडे लावताना विटांच्या चुऱ्याचा पहिला थर, त्यानंतर नारळाच्या शेंडय़ा, पालापाचोळ्याचा तिसरा थर आणि चौथ्या थरामध्ये ओल्या कचऱ्याचा वापर केला आहे.
ड्रमच्या चारी बाजूने छिद्रे पाडण्यात आली आहेत. या प्रयोगामध्ये मोसंब, चिक्कू, लिंबू, जांभूळ, आंबा, डाळिंब, पपई, अंजिर, सीताफळ ही फळझाडे; वांगी, कांदा, पालक, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, लसूण, अळू, कढीपत्ता, मेथी अशा भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून इतर किटक तयार होऊ नयेत, यासाठी आयव्हीईएम व इनोरा या रसायनांचा वापर करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, शिक्षिका शुभदा राजगुरू, अद्वयता उमराणीकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

Story img Loader