दुपारच्या कडक उन्हात सावली शोधणाऱ्या असंख्य मुंबईकरांना बागांची कवाडे खुली होण्याची शक्यता आहे. मोकळ्या जागांचा व त्यातही वेळेचा तुटवडा असलेल्या या शहरात केवळ सकाळी आणि संध्याकाळी खुल्या राहणाऱ्या बागांमधील मोकळ्या जागेचा, वृक्षराजीचा आनंद इच्छा असूनही अनेकांना घेता येत नाही. त्यामुळे बागा दुपारच्या वेळीही खुल्या ठेवण्याबाबत पालिकेकडून प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबईतील सहा प्रातिनिधिक बागांचा अभ्यास ‘ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन’मार्फत पर्यावरणतज्ज्ञ ऋषी अग्रवाल यांनी केला. उत्तम देखभाल व गर्द छाया असलेल्या बागांमधील प्रवेश मात्र मर्यादित ठेवण्यात आले होते. सकाळी ६ ते १० व संध्या ४ ते ९ या वेळेत प्रवेश देणाऱ्या बागांमध्ये खाणे व झोपणेही निषिद्ध असते. मात्र प्रचंड गर्दी, कामाचा तणाव व मोकळ्या जागांची कमतरता असलेल्या शहरातील प्रत्येकाला सकाळी किंवा संध्याकाळी बागेत जाणे शक्य नसते. गृहिणी, वृद्ध तसेच कार्यालयात केवळ दुपारच्या जेवणाचा वेळ मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांना दुपारची वेळ सोयीची असते. त्यातच हिवाळ्याचे तीन महिने तसेच पावसाळ्यात पाऊस नसतानाच्या दिवसात दुपारच्या वेळी कडक ऊन नसते, असे निरीक्षण अग्रवाल यांनी मांडले. गर्दुल्ले तसेच जुगारी, जोडपी, दुपारी खाण्यासाठी तसेच झोपण्यासाठी येणाऱ्यांमुळे सुरक्षेचे तसेच स्वच्छतेच्या समस्या येतात तसेच पर्यटक असताना दुपारच्या वेळेत बागा स्वच्छ करणे सोपे होत नाही, अशा समस्या काही बागा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थाचालकांकडून मांडण्यात आल्या. मात्र दक्षिण मुंबईत असलेल्या क्रॉस मैदान तसेच हॉर्निमन सर्कल मैदान दुपारच्या वेळीही खुले असते. अनेकजण दुपारच्या वेळेस या बागांमध्ये झोपतात. मात्र त्यामुळे बागेचे कोणतेही नुकसान झालेले नाही तसेच दुपारी बागा खुल्या असल्याने सुरक्षा तसेच देखभालीचाही प्रश्न उभा राहिलेला नाही, असे या दोन्ही बागांच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. शहरातील इतर बागांनीही यांचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही, असे मत ओआरएफच्या अहवालात मांडण्यात आले आहे.
सुरक्षेचे तसेच देखभालीच्या समस्या सोडवून दुपारीही या बागा खुल्या ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील दोनशेहून अधिक बागा काळजीवाहू तत्त्वावर खासगी संस्थांकडे देण्यात आल्या आहेत. त्यांनाही या बागा दिवसभर खुल्या ठेवण्याची अट घालण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिले.

* मुंबईत प्रति माणशी १.१ चौरस मीटर मोकळी जागा
* शिकागोमध्ये १७.६ चौ. मी, न्यूयॉर्कमध्ये २६.४ चौ. मी.,
* तर लंडनमध्ये ३१.७ चौ. मी मोकळी जागा
* युरोपमध्ये सर्व बागा चोवीस तास खुल्या
* अमेरिकेतील सेंट्रल पार्कही पहाटे पाच ते रात्री एकपर्यंत खुले.

Story img Loader