मोर्शी येथील पेठपुरा परिसरातील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीररीत्या भाजल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या स्फोटामुळे घराच्या दोन भिंतीही कोसळल्याने त्याखाली दबून ३ लोक जखमी झाले. जखमींवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे १ हजार लोक रुग्णालयासमोर जमल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
मोर्शी येथे पेठपुरा भागातील हसनभाई शेख जुमान यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलिंडरमधून रात्री ९ वाजताच्या सुमारास वायुगळती झाली आणि घरातील सदस्यांना ते लक्षात येण्याआधीच जोरदार स्फोट झाला. हसनभाई यांच्या घरातच किराणा दुकानही आहे. स्फोटाची तीव्रता जास्त होती. किराणा दुकानाचे शटर उडून ते दूरवर फेकले गेले आणि घराच्या दोन भिंती कोसळल्या. हसनभाई यांच्या घरातच त्यांचे दोघे भाऊ इमाद अली, आसीफ आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. स्फोट झाला तेव्हा सर्व जण घरीच होते. या स्फोटात साजीया बानो (२५) या तरुणीचा मृत्यू झाला असून १४ जण भाजले गेले, तर तिघे ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाले. अनेक जण ४५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजले गेले आहेत. भिंत अंगावर कोसळल्याने काहींना फ्रॅक्चर झाले आहे. या स्फोटात घरासमोरून जाणारा एक युवकही जखमी झाला.
स्फोटाचा आवाज मोर्शी शहरात दूपर्यंत ऐकला गेला. शेजारचे लोक हसनभाई यांच्या घराच्या दिशेने धावले. जखमींना सुरुवातीला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. जळालेल्या रुग्णांवरील उपचाराचा कक्ष रुग्णांनी खच्चून भरला गेला. काहींना मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींमध्ये तीन महिला आणि एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. खर मोहम्मद शाह (२६), शेख हसन शेख जुमान (६५), अहमद जमील अ. हसन (३५), शेख जुबेर शेख हसन (५२), शेख जहांगीर शेख हसन (३८), रेहाना बानो अ.अली (६५), मदिनोद्दीन (५), अबू मुश्ताक (२५), जहांगीर मुश्ताक (३०), मो. आसीफ मो. रशीद (२८), अलीओन्निसा शेख हसन (४५), फिरोज खाँ अहमद खाँ (४०), मो. शाकीर मो. हुसेन (३०), मो. जहाँगीर मो. हुसेन (३७), अ. सोहेल अ. ताजीब (१९), अझरुद्दिन कमरुद्दिन (१९), अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, मोर्शीचे ठाणेदार विजय पाटील आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आमदार डॉ. अनिल बोंडे बराच वेळ जिल्हा सामान्य रुग्णालयात थांबून होते. अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली. सुमारे १ हजार लोक रुग्णालयासमोर जमल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Story img Loader