या शहरातील प्रतिष्ठित गॅस सिलिंडर वितरकांकडून हिन्दुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांच्या सिलिंडरचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. वितरक गावातील छोटय़ा दुकानदारांना हाताशी धरून हा काळाबाजार करत असून गडचांदूर येथील गोपाल मालपानी (४५) यांच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या काळ्याबाजारात खांडरे एन्टरप्राईजेसचे सम्राट खांडरे व बल्लारपूर इंडियन एजन्सीचे कुळमेथे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या या जिल्ह्य़ात एच.पी.सी.एल. अर्थात हिन्दुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांचे एकूण २५ गॅस वितरक असून जवळपास दीड लाख ग्राहकांकडे कनेक्शन आहेत. ही अधिकृत आकडेवारी असली तरी बहुतांश अनधिकृत ग्राहक असून यातील बहुतांश गॅस वितरकांकडून ग्राहकांना अतिरिक्त पैशाच्या मोबदल्यात सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने सिलिंडरवर र्निबध आणण्याचा विचार सुरू केला तेव्हापासून हा काळाबाजार सुरू झाला अशातलाही भाग नाही. गेल्या कित्येक वर्षांंपासून तो अविरतपणे सुरूच आहे. या शहरात इंडियनच्या चेतक गॅस, सरोज गॅस, चेतक अ‍ॅडहोक व कमल गॅस, असे चार वितरक आहेत. यातील कमल गॅस एजन्सी बंद आहे, तर एचपीसीएलच्या स्वस्तिक, खांडरे, सप्रेम, सुविधा व लालपेठ कॉलरीत सोसायटीची एक एजन्सी, असे पाच वितरक आहेत. जिल्ह्य़ात एक दोन तालुके सोडले तर बहुतांश तालुक्यात वितरक आहेत. यात भद्रावतीत २, बल्लारपूर ३, वरोरा १, सिंदेवाही १, ब्रम्हपुरी २, गोंडपिंपरी १, पोंभूर्णा १, मूल १, राजुरा १, सास्ती १, गडचांदूर १, राजूरा १ व चिमूर शहरात एक वितरक आहे.
ज्या तालुक्यात किंवा गावात गॅस वितरक आहे त्या गावात दुसऱ्या गॅस वितरकांनी सिलिंडरचा पुरवठा करू नये, असा कायद्याने नियम आहे, परंतु सिलिंडरचा काळाबाजार करतांना वितरकांकडून मोठय़ा प्रमाणात अवैध स्वरूपात सिलिंडर्स देण्यात येतात. गडचांदूर येथे वितरक नसलेल्या गोपाल मालपानी यांच्याकडे पोलिसांनी छापा मारला असता २०० सिलिंडर्स पकडण्यात आले. यातील ९१ सिलिंडर सम्राट खांडरे यांच्या खांडरे एन्टरप्राईजेसचे, तर ६० सिलिंडर बल्लारपूर येथील कुळमेथे एजन्सीचे आहेत. मालपानी हे या दोन वितरकांकडून ३७५ रुपयात सिलिंडर विकत घेत होते आणि गडचांदूर येथे ५०० रुपयाला विकत होते. केवळ गडचांदूर नाही, तर कोरपना, जिवती, गडचांदूर, राजुरा या भागात मालपानी यांच्या माध्यमातून सिलिंडर्सचा काळाबाजार सुरू होता. गावखेडय़ातील लोकांना तात्काळ सिलिंडर पाहिजे असल्याने अतिरिक्त पैसे आकारून त्यांना सिलिंडर दिले जात होते.
पोलीस कोठडीत स्वत: मालपानी यांनी खांडरे व कुळमेथे एजन्सीकडून आपणाला सिलिंडरचा पुरवठा होत होता, अशी माहिती दिलेली आहे. या दोनच वितरकांकडून नाही, तर या शहरातील बहुतांश वितरकांकडून अशा पध्दतीने सिलिंडरचा काळाबाजार जोमात सुरू आहे. प्रत्येक वॉर्डात, गावात किराणा दुकान, सिमेंट वितरकांच्या कार्यालयात सिलिंडर विकत मिळेल, असा बोर्ड बघावयास मिळतो. एकाच दिवशी चारशे ते पाचशे सिलिंडर अशा अवैध पध्दतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येतात. एका सिलिंडरमागे मालपानीसारखे दलाल शंभर ते दिडशे रुपये कमावित आहेत. यात वितरकांना सुध्दा ५० रुपये प्रती सिलिंडर मिळत असल्याने त्यांचेही फावले आहे. या काळ्याबाजारात खांडरे व कुळमेथे यांचे नाव प्रत्यक्ष समोर आले आहे. यातील कुळमेथे पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले आहेत, तर खांडरे यांनी जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेऊन ठेवला आहे. पोलीस कुळमेथे यांचा शोध घेत असून त्यांच्या अटकेनंतर या काळ्याबाजारातील अनेक बाबी समोर येणार आहेत.   

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Story img Loader