वाडा तालुक्यातील सापणे गावात मोठय़ा प्रमाणात गॅस्ट्रोची साथ आली असून या एकाच गावातील १४ रुग्णांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गावासह तालुक्यातील अन्य ठिकाणीही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण अनेक सोयी सुविधांनी अपुऱ्या असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णांना फरशीवर झोपवून उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे या रुग्णालयाला सध्या कोंडवाडय़ाचे स्वरूप आले आहे. गॅस्ट्रोची साथ पसरल्याच्या पाश्र्वभूमीवर सापणे गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक उपचारासाठी पाठविण्यात असून ते गावातील अन्य रुग्णांवर उपचार करीत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नळ पाणीपुरवठा योजनेला शुद्धीकरण यंत्रणा नसल्यामुळे नळाला नदीमधून येणारे दूषित पाणी येथील ग्रामस्थांना प्यावे लागते, असे येथील माजी सरपंच मधुकर भोईर यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यात एकमेव असलेले सरकारी रुग्णालय अवघ्या ३० खाटांचे असून या रुग्णालयाच्या छतातून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दररोज सुमारे चारशे ते पाचशे बाह्य रुग्णांच्या तपासणीसाठी असलेल्या कक्षात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयाला गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधीक्षकच नाही. सध्या उपलब्ध असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने त्यांना जादा काम करावे लागते. जागेअभावी अनेक रुग्णांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच अन्य खासगी रुग्णालयांत पाठविण्यात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा