उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठय़ाला गढूळ पाण्याचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये गढूळ पाणी येत असल्याने गॅस्ट्रो आणि उष्माघात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकल, आयसोलेशन या रुग्णालयात गेल्या दहा दिवसांत २३० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयासह महापालिकेच्या आयसोलेशन आणि काही खाजगी रुग्णालयात उष्माघात आणि गॅस्ट्रोचे रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मेडिकलमध्ये वॉर्ड ३२ आणि ३५ हा गॅस्ट्रोआणि उष्माघातच्या रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आला असून सध्या गॅस्टोचे १४ रुग्ण उपचार घेत असून उष्माघाताचे ६ रुग्ण आहेत. आयसोलेशन हॉस्पिटमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. ४० बेड असलेल्या या रुग्णालयात गेल्या आठ दिवसात १२० गॅस्टोच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील अनेक रुग्णांना दूषित पाण्यामुळे गॅस्टो झाल्याचे तपासणीत लक्षात आले. मेडिकलच्या बाह्य़ रुग्ण विभागात १२० तर मेयोच्या बाह्य़ रुग्ण विभागात ४० च्या जवळपास गॅस्टोच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
रुग्णांना बारीक ताप येणे, हगवण लागणे, अंगदुखी पाठदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे ही गॅस्ट्रोची लक्षणे आहेत. गडचिरोली, चंद्रपूर , भंडारा, गोंदिया तर नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर, मौदा, नरखेड या भागातील रुग्ण आयोलेशन हॉस्पिटमध्ये दाखल झाले होते. त्यातील अनेकांवर उपचार करून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यातील आजार, उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी शहरातील विविध रुग्णालय स्वतंत्र कक्ष (शीत वॉर्ड) तयार करण्यात आले असून, शहरातील इतर खाजगी रुग्णालयांतही व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ४५ अंशांवर पोहोचलेले प्रखर उष्णतेचे अस्मानी तर भीषण पाणीटंचाईच्या सुल्तानी संकटाने सर्वसामान्य जनता पुरती होरपळून निघाली आहे. उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूषित पाणी आणि रस्त्यावरील उघडे पदार्थ खाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. मेडिकलमध्ये गॅस्टो आणि उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था वॉर्ड तयार करण्यात आले असून चोवीस तास डॉक्टर आहेत शिवाय स्वतंत्र शीतवॉर्ड तयार करण्यात आला आहे. मे महिन्यातील वाढते तापमान आणि ग्रामीण आणि शहरातील काही भागात गढुळ पाण्याची समस्या बघता रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा