शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयातील विविध समस्यांसदर्भात आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी रुग्णालयाच्या विकासासंदर्भात केवळ आश्वास दिली असली तरी रुग्णांच्या समस्या, रुग्णालयाची दयनीय अवस्था आणि जनतेच्या प्रश्नांचे काय, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित केला. डॉ. गावित यांनी घेतलेली बैठक म्हणजे केवळ ‘फार्स’ असल्याची टीका लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
गेल्या ५० वर्षांंपासून विदर्भाच्या विविध भागातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी मेडिकलसह मेयो आणि दंत रुग्णालयात येतात, मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे रुग्णालयाच्या समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. सहा महिन्यांपूर्वी डॉ. गावित यांनी मेडिकलचा दौरा करून विकासासंबंधी भरपूर आश्वासने दिली होती, मात्र ती केवळ कागदावर होती. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या विकासासंदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी डॉ. गावित यांनी रविवारी लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, आमदार दीनानाथ पडोळे, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुनील केदार यांच्यासह मेडिकलच्या प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडतात तशा समस्यांचा पाढा लोकप्रतिनिधींनी डॉ. गावित यांच्यासमोर वाचल्यानंतर त्यांनी सभागृहाप्रमाणेच केवळ आश्वासने देऊन लोकप्रतिनिधीचे समाधान व्यक्त केल्याची टीका भाजपच्या आमदारांसह काही सामाजिक संघटनांनीही केली.
मेयो आणि मेडिकलच्या विकासासंदर्भातील प्रश्न, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे किंवा औषधांचा पुरवठा, या प्रश्नांसंदर्भात डॉ. गावित यांनी यापूर्वी अनेकदा आश्वासने दिलेली आहेत, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मेडिकलसह नागपुरातील विविध शासकीय रुग्णालयांचा दौरा करून रुग्णांच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या, या उद्देशाने शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह भाजपच्या आमदारांनी आग्रह धरला, मात्र डॉ. गावित बैठक घेऊन रवाना झाले. मेडिकलमध्ये आल्यानंतर केवळ वातानुकुलीत खोलीत बसून प्रश्न सुटत नाही, तर काही ठराविक वॉर्डांमध्ये भेटी देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे होते. मेडिकल परिसरासह, वसतिगृह, सुपर स्पेशालिटी आदी ठिकाणी डॉ. गावित यांनी भेटी देणे आवश्यक होते, मात्र त्यांनी दिवसभरचा वेळ केवळ चर्चेत घालविल्यामुळे पुन्हा रुग्णांच्या समस्येचे काय, असा प्रश्न जनमंचच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.   

Story img Loader