वेशभूषा नव्हे, दृष्टी बदला, असा संदेश देत शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मंगळवारी जीन्स परिधान करून ‘जीन्स डे’ साजरा केला. विवेकानंद, न्यू आदी कॉलेजमध्ये मुलींना जीन्स परिधान करण्यास मज्जाव असल्याने तेथील विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या खुर्चीला धोतर नेसवून संताप व्यक्त केला. तर, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुलींवरील अन्यायप्रकरणी जिल्हा व पोलीस प्रशासन सतर्क राहून छेडछाड करणाऱ्यांना कठोर शासन करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले.
देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी होऊ लागली आहे. तरूणींचा आधुनिक पोशाख हा बलात्कारासारख्या घटनांना कारणीभूत असल्याचे मत नोंदविले जात आहे. मात्र, या मताला कोल्हापुरातील महाविद्यालयीन तरूणींचा सक्त विरोध आहे. आधुनिक पेहराव नव्हे, तर लोकांची दृष्टी बदलल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील, असे महाविद्यालयीन युवतींचे म्हणणे आहे.त्यासाठी शहरातील बहुतांश महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज जीन्सचा पेहराव करूनच महाविद्यालयात आल्या होत्या. त्यामुळे शहरात आजच जीन्स डे चे वातावरण सर्व महाविद्यालयांत दिसत होते.
 विवेकानंद, न्यू या कॉलेजमध्ये जीन्स वापरण्यास मज्जाव केलेला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थिनीं जीन्सविनाच महाविद्यालयात आल्या होत्या. महाविद्यालयीन व्यवस्थापनाच्या भूमिकेवर त्यांचा राग दिसत होता. त्यातूनच ऑल इंडिया युथ फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिवाजी विद्यापीठामध्ये दाखल झाल्या. विद्यार्थी संघटनेचे गिरीश फोंडे, मेघा पानसरे, प्राची शिंदे, दीपाली क्षीरसागर, ज्योती भालकर आदींनी कुलगुरूंना या संदर्भात विचारणा केली. त्यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र व्यवस्थापनाच्या मागास दृष्टिकोनावर संतापलेल्या विद्यार्थिनींनी कुलगुरूंना धोतराचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो नाकारला. त्यावर विद्यार्थिनींनी कुलगुरूंचे स्वीय सहायक सावंत यांच्या खुर्चीला धोतर नेसवून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात तरूणीवरील अन्यायप्रकरणी विद्यापीठ, महाविद्यालयीन प्रतिनिधी व सर्व प्राचार्याची बैठक झाली. ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजाराम माने,कुलगुरू डॉ.एन.जे.पवार, पोलीस उपअधीक्षक महेश सावंत, जयवंत देशमुख, ऑल इंडिया युथ फेडरेशन विद्यार्थी संघटनेच्या ज्योती भालकर, मेघा पानसरे, गिरीश फोंडे व प्राचार्यानी आपली भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर महाविद्यालयांकडून घातली जाणारी अन्यायकारक बंधने रद्द करण्यात यावीत,त्यांना मोबाईल व हवी ती वेशभूषा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींनी केली.चर्चेचा समारोप करतांना जिल्हाधिकारी माने यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर त्याची गंभीरपणाने दखल घेतली जाणार आहे. पोलीसांकडे अशा तक्रारी आल्यानंतर आरोपींवर सत्वर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थिनींचा गणवेश व मोबाईल वापरासंबंधात अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टी हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

 
 

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geans day celebrated by girl students in kolhapur