ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले ‘गीत रामायण’ ही मराठी माणसाच्या मर्मबंधातील ठेव आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावरून सादर झालेल्या ‘गीत रामायण’ कार्यक्रमाला अमाप लोकप्रियता मिळाली. ‘गीत रामायण’च्या हिरक महोत्सवी वर्षांनिमित्ताने सोमवारी, १२ मे रोजी शिवाजी मंदिर येथे गीत रामायणाच्या आठवणींचा पट पुन्हा एकदा उलगडला जाणार आहे.
आगळ्यावेगळ्या कल्पना घेऊन रसिकांसाठी विविध कार्यक्रम सादर करणारे, ‘माझा’पुरस्कार देऊन गुणवंत कलाकारांना गौरविणारे तर कधी विस्मृतीत गेलेल्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ कलावंताना एकत्र आणून ‘हितगुज’ करणारे धडपडे व्यक्तिमत्व अशोक मुळ्ये अर्थात ‘मुळ्ये काका’ यांनी ‘हे सारे गीत रामायण‘साठी’या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शिळफाटा येथील लकी कंपाऊंड ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटने अनाथ झालेल्या एका छोटय़ा मुलीला दत्तक घेणारी शीव रूग्णालयातील परिचारीका वीणा कडले आणि त्यांचे पती भाग्येश यांना करूणामय अंत:करण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिवाजी मंदिर, दादर येथे रात्री साठेआठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जयंत पिंगुळकर, श्रीरंग भावे, सागर फडके, अर्चना गोरे, केतकी भावे-जोशी हे गायक कलाकार गीतरामायणामधील काही निवडक गाणी सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे तर निवेदन भाऊ मराठे यांचे आहे. या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील काही गुणवंतांचा आणि वेगळे कार्य करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्यांचा सत्कारही केला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असून कार्यक्रमाच्या शिल्लक प्रवेशिका १० मे पासून सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शिवाजी मंदिर नाटय़गृह येथे उपलब्ध असतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा