शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असताना खड्डे बुजवण्यात महानगरपालिकेकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी मनपाच्या आवारातच खड्डे खोदून त्याकडे लक्ष वेधले. महापौर शीला शिंदे यांनाही या कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
शहरात मोठा पाऊस झाला नसला तरी सततच्या पावसाने बहुसंख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहने चालवणे तर मुश्कील झाले आहेच, मात्र अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्त्यातील खड्डय़ांमुळे अनेकांना मणक्यांचे आजारही होऊ लागले आहेत. संततधार पावसाच्या पार्श्र्वभूमीवर मनपाने पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे जाहीर केले होते. शहरात चार, पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी ही कामे सुरू न झाल्याने मनसेने बुधवारी त्या निषेधार्थ आंदोलन केले.
मनसेचे नेते वसंत लोढा, नगरसेवक गणेश भोसले, किशोर डागवाले, जिल्हा संघटक सचिन डफळ, सतीश मैड, नितीन भुतारे, अनिता दिघे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. टिकाव घेऊनच हे कार्यकर्ते मनपा आवारात आले. आवारातील पेव्हिंग ब्लॉक खणून त्यांनी येथेचे खड्डे खोदले. मनपाच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दरम्यान महापौर शीला शिंदे या वेळी मनपात आल्या, त्यांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून निषेध व्यक्त केला. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.     

Story img Loader