खराब पावाची विक्री केली म्हणून कारावास ठोठावण्यात आलेल्या जळगाव येथील बेकरीवाल्याला तब्बल १९ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
६ जानेवारी १९९५ रोजी संबंधित अन्न निरीक्षक अचानक पाहणीसाठी आरोपी शैख अलीमोद्दीन याच्या बेकरीमध्ये गेले होते. त्यांनी चाचणीसाठी पावाचे काही नमुने बेकरीतून घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवले. १४ फेब्रुवारी १९९५ रोजी अन्न विश्लेषकाने त्याबाबतचा अहवाल दिल्यावर त्या अहवालाच्या आधारे अलीमोद्दीन आणि त्याचा नोकर शेख जलालुद्दीन या दोघांविरुद्ध खराब पावाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. इथूनच त्या दोघांच्या शिक्षेची सुरुवात झाली. सन २००६मध्ये त्यांना महानगरदंडाधिकाऱ्यांकडून सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सन २०११मध्ये या शिक्षेवर जिल्हा सत्रन्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. यानंतर त्यांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. पाव ताब्यात घेतल्यानंतर त्याचे परीक्षण होऊन त्याचा अहवाल येईपर्यंत पाव हवाबंद डब्यात ठेवणे गरजेचे असताना संबंधित अन्न निरीक्षकाने तो प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याचा दावा त्यांनी निर्णयाला आव्हान देताना केला होता. या आधारावर फाची शिक्षा रद्द करावी अशी मागणीही त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. एवढेच नव्हे, तर आपल्या पावाच्या विश्लेषणाच्या अहवालाची प्रतही आपल्या देण्यात आली नव्हती, असा आरोपही त्यांनी दाव्यात केला होता. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अन्न निरीक्षकांनी ज्या प्रकारे पाव बेकरीतून जप्त केले ती प्रक्रिया योग्य नसल्याचे स्पष्ट केले आणि दोघांची निर्दोष मुक्तता केली.

Story img Loader