शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी महानगरपालिका आणि इतर संबंधित संस्थांच्या साहाय्याने प्राथमिक पाहणी करून प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील शिष्टमंडळाला केली असल्याची माहिती नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार यांनी दिली.
शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी माजी केंद्रीयमंत्री विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. नाशिक हे महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये प्रमुख आहे. पूर्व-पश्चिम २५ किलोमीटर आणि दक्षिण-उत्तर असा सुमारे २० किलोमीटर शहराचा विस्तार असून, त्यात अजून वाढ होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहराचा विकास होत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरातील रस्ते वाढत्या वाहनसंख्येमुळे अपुरे पडत असून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
नाशिक मेट्रोसाठी पाहणी करताना अंबड-सातपूर-सिन्नर औद्योगिक वसाहत, त्र्यंबकेश्वर, एचएएल ओझर कारखाना, नियोजित विमानतळ यांचाही विचार करण्याची सूचना माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आ. माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिक शहरातून जाणाऱ्या कालव्याच्या सरकारी जमिनीचा मेट्रो प्रकल्पासाठी विचार करावा. त्यामुळे शासनाला प्रकल्पासाठी कमी पैसा लागेल, असे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि रमेश पवार यांनी सुचविले.
मेट्रो प्रकल्पाचा अहवाल करताना तांत्रिक व आर्थिक बाबींचा विचार करावा, तसेच महानगरपालिका, राज्य व केंद्र शासन यांच्या सहभागातून नाशिक शहरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महानगरपालिकेत यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालिकेतील काँग्रेस गटनेते लक्ष्मण जायभावे, नगरसेवक उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात पाटील, बच्छाव, पानगव्हाणे, पवार, कोकाटे निमसे, गांगुर्डे, जायभावे यांसह कसमादेश उद्योजक संघाचे अध्यक्ष तुषार चव्हाण, संजय महाजन, बाळासाहेब गुंजाळ, कैलास वराडे आदींचा सहभाग होता. शिष्टमंडळात काँग्रेसशी संबंधित मंडळींचा अधिक भरणा होता.

Story img Loader