जन्मजात श्रवणदोष वेळीच लक्षात येऊन योग्य उपचारामुळे मूकबधिरत्वाच्या शापापासून मुक्ती मिळविलेल्या मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे एक हृद्य संमेलन गेल्या शनिवारी ठाण्यातील सत्कार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
मूल जन्माला आल्यावर इतर सर्व तपासण्या होतात, पण श्रवणदोष चाचणी होत नाही. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये तशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे जन्मजात श्रवणदोष असलेल्या मुलांचे वाचाकेंद्रही निद्रावस्थेतच राहून ती मुकी होतात. जन्माला येणाऱ्या एक हजार मुलांमध्ये तीन ते चार मुलांमध्ये श्रवणदोष असतो आणि योग्य निदान आणि उपचारांअभावी त्यांच्यावर मुकेपणही लादले जाते. येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल गेली चार वर्षे श्रवणदोष चाचणीबाबत जनजागृती करीत आहेत. तीन महिने ते तीन वर्षे या कालावधीत श्रवणदोष आढळून आल्यास कॉक्लेअर इन्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे ध्वनिकंपने मेंदूच्या वाचाकेंद्रापर्यंत पोहोचविता येऊन मुलांना बोलते करता येऊ शकते. गेल्या चार वर्षांत डॉ. उप्पल यांनी शस्त्रक्रिया करून बोलते केलेली २५ मुले आणि त्यांचे पालक या संमेलनास उपस्थित होते. त्यापैकी काही मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या बोबडय़ा बोलांनी उपस्थित सारे भारावले. मुलांच्या पालकांनीही मनोगत व्यक्त केले. ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील या वेळी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात श्रवणदोष चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल डॉ. उप्पल यांनी या वेळी खंत व्यक्त केली. गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी पालकांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची तरतूद पालिकेने अर्थसंकल्पात केल्याची माहिती आयुक्त गुप्ता यांनी या वेळी दिली. श्रवणदोष शस्त्रक्रिया खर्चिक असून पालिका नियमांच्या अखत्यारीत मदत करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

Story img Loader