भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बापू घडामोडे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी मावळते शहर जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्यासह चौघा इच्छुकांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतल्याने सर्वानुमते घडामोडे यांची निवड झाली. या पदासाठी पक्षशिस्तीचा दाखला देत बिनविरोध निवड पार पडली. मात्र, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवर एकमत होऊ न शकल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल १५जण इच्छुक होते. त्यांच्यामध्ये एकच नावावर एकवाक्यता होऊ न शकल्याने ही निवडच अखेर स्थगित करण्यात आली. या पदाबाबतचा निर्णय पक्षाच्या प्रदेश शाखेवर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेले काही दिवस या दोन्ही पदांसाठी भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी घडत होत्या. नेते-कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून यावर बराच खल झाला. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी मंगरुळे पुन्हा इच्छुक होते. त्यांच्यासह घडामोडे, विजय साळवे, शिरीष घोराळकर व संजय केणेकर हेही स्पर्धेत असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंगरुळे यांच्यासह चौघांनी माघार घेतल्याने घडामोडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यांची निवड तीन वर्षांसाठी आहे. मंगरुळे यांच्याकडून घडामोडे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. पक्षातर्फे नागनाथ नदावडे (उदगीर) निरीक्षक, तर श्रीकांत जोशी त्यांना सहायक होते.
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदीप पाटील, सुरेश बनकर, भाऊसाहेब दहिहंडे, बाबुराव कोळगे, एकनाथ जाधव, डॉ. नारायण फड, सुरेंद्र साळुंके, सज्जनराव मते, डॉ. भागवत कराड, आसाराम तळेकर, राजेंद्र जयस्वाल, पांडूपाटील लोखंडे, रेखाताई कुलकर्णी आदी १५जण इच्छुक होते. प्रदेश शाखेने पाठविलेले निरीक्षक सुहास फरांदे व सहायक हरजितसिंग ठाकूर यांनी निवड प्रक्रिया सुरू केली. मात्र, इच्छुकांपैकी कोणीही माघार न घेतल्याने एकाच नावावर एकवाक्यता होणे अवघड झाले. बराच खल झाल्यावर अखेर ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचे सर्वाधिकार प्रदेश शाखेकडे सोपविण्यात आले.

Story img Loader