पनवेलमधला वसुलीपूर्वीच चर्चेत बनलेल्या खारघर टोलनाक्यावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद करून टोल आंदोलनाचे बिगुल फुंकले. पोलिसांच्या सुरक्षेत हे आंदोलन घेतल्याने घंटानाद केल्याने घंटा आहे पण तंटा नाही असे एकूण चित्र आंदोलनस्थळी होते.
राज्यभर टोलनाक्यांवर होणाऱ्या वसुलीविरोधात मनसेने पुन्हा एकदा वातावरण निर्माण करण्यासाठी हे आंदोलन हाती घेतले आहे. मनसेच्या या आंदोलनामुळे पनवेल येथील खारघर टोलनाक्याच्या सुरू होण्याअगोदर विरोधाला बळ मिळणार हे निश्चित झाले आहे. वाशीपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारा खारघरचा टोलनाका हा अन्यायकारक असल्याचे मनसेचे मत आहे. पनवेल तालुक्यात सद्यस्थितीला धानसर, द्रुतगती मार्ग, कोन, पारगाव, खारपाडा, पनवेल असे टोलनाके सुरू आहेत. सरकारला जागविण्यासाठी हे आंदोलन मनसेने घेतल्याचे मनसेचे जिल्हा सरचिटणीस केसरीनाथ पाटील यांनी सांगितले. या आंदोलनामुळे खारघरच्या स्पॅगेटी थांब्यावर मनसे कार्यकर्ते व पोलिसांच्या कुमकेमुळे येथे एसटी बसचालकांना गाडय़ा उभ्या करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. यावेळी हातात घंटा व टाळ वाजवून मनसैनिकांनी एकसुरात सरकारविरोधी भजने म्हटली.

Story img Loader