गोदावरी नदीच्या पात्रात सिमेंट काँक्रीटचे पक्क्या स्वरूपात घाट बांधण्याऐवजी अलाहाबादच्या धर्तीवर तात्पुरत्या स्वरूपात घाट बांधणीला प्राधान्य द्यावे, गोदावरी नदीचे पाणी आणि मल-जल हे वेगळे केले जावे, सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल माहिती देणाऱ्या एक लाख पुस्तिकांचे वितरण करावे, अशा विविध सूचना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केल्या. आगामी कुंभमेळा पर्यावरणस्नेही करण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत हरित कुंभावर चर्चा झाली. तपोवनच्या लगत नव्याने बांधल्या जाणाऱ्या घाटाच्या बांधकामाबद्दल पुनर्विचार करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. महापालिकेने सिंहस्थात शहरात प्लास्टिक बंदी करण्याचे मान्य करून बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचे मान्य केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांच्यासह गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडित यांच्यासह पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी कुंभमेळा हरित कुंभमेळा म्हणून साजरा केला जावा यासाठी अनेक संस्थांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजेंद्र सिंह यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयोजनातील वेगवेगळ्या मुद्दय़ांवर प्रशासनाला निवेदन सादर केले. गोदावरीच्या पात्रात अनेक ठिकाणी आधीच पक्क्या स्वरूपाची अनेक बांधकामे करण्यात आली आहेत. परिणामी, नदीला नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण झाली असताना सिंहस्थासाठी पुन्हा नव्याने पक्क्या स्वरूपाच्या घाटांचे बांधकाम केले जात असल्याविषयी त्यांनी आक्षेप नोंदविला. मुळात, गोदावरी बारामाही नदी नाही. गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर पात्रातून पाणी वाहते. या स्थितीत पक्क्या बांधकामांमुळे नदीचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे. अलाहाबादच्या कुंभमेळ्यात १८ पैकी १४ घाट हे तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले. या धर्तीवर गोदावरी पात्रावर तात्पुरत्या स्वरूपात घाटांची व्यवस्था केल्यास नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राहील, याकडे सिंह यांनी लक्ष वेधले. महसूल आयुक्तांनी उपरोक्त घाटांच्या बांधकामामुळे गोदावरीच्या प्रवाहाला कोणताही अवरोध होणार नसल्याचे सांगून या कामाचा पुन्हा विचार केला जाईल, असे म्हटले आहे.
सिंहस्थात गोदावरी नदीपासून २०० मीटर क्षेत्रांत तसेच साधुग्राम या ठिकाणी प्लास्टिकला बंदी घालावी, अशी मागणी सिंह यांनी केली. त्यावर महापालिकेने स्पष्टीकरण दिले. सिंहस्थात केवळ नदीकाठचा परिसरच नव्हे तर, संपूर्ण शहरात प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांकडून शहराबाहेरील नाक्यावर प्लास्टिकचे साहित्य काढून घेतले जाईल. भाविकांना कापडी पिशव्या वा तत्सम पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येणार आहेत. त्यांना कुंभमेळा ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी एक लाख छोटेखानी पुस्तिका वितरित करण्याची प्रशासनाने तजवीज करावी, अशीही सूचना करण्यात आली. गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीतील पाणी आणि शहरातील पात्रात सोडले जाणारे मलजल वेगळे करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई करावी, नदी पात्राचा वापर माती व तत्सम साहित्य टाकण्यास प्रतिबंध करावा, आदी मागण्या निवेदनात समाविष्ट आहेत.

Story img Loader