घोणस जातीच्या एक, दोन नाही तर तब्बल ५२ पिलांचा जन्मसोहळा याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य येथील तरुण सर्पमित्र वैभव काशिद व त्याच्या सहकाऱ्यांच्या वाटय़ाला आले. हे तरुणच सध्या पिलांचे संगोपन करत असून बाळे व बाळंतीण दोन्हीही सुखरुप आहेत. लवकरच त्यांना हरिश्चंद्रगड परिसरातील जंगलात सोडून देण्यात येणार आहे.
अकोले येथील धुमाळवाडी रस्त्यावर वैभवने अमित गायकवाड व विशाल वैराट या सर्पमित्रांच्या सहकार्याने घोणस जातीच्या सुमारे चार फूट लांबीचा साप पकडला. या सापाच्या हालचाली मंद वाटल्यामुळे त्याला तात्काळ सोडून न देता त्यांनी बादलीत बंदीस्त करुन ठेवला. या सापाला पिल्ले होणार असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी त्याची विशेष काळजी घेतली. पिलांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी दोन रात्री जागून काढल्या. अखेर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पहिले पिलू जन्माला आले. त्यानंतर तब्बल ५२ पिलांना या सापाने जन्म दिला. पाच तास हा जन्मसोहळा सुरु होता. या संपूर्ण घटनेचे त्यांनी छायाचित्रणही केले आहे. या पिलांना एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. दहा ते अकरा इंच लांबीची ही पिल्ले आहेत. खाण्यासाठी त्यांना लहान लहान गांडूळे देण्यात येतात. पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मादीला उंदीर, बेडूक असे खाद्य दिले जात आहे.
घोणस हा विषारी साप असून तीन ते पाच फूटापर्यंत त्याची लांबी असते. मानवी वस्तीच्या आसपास त्याचे वास्तव्य असते, मात्र तो सहसा घरांमध्ये प्रवेश करीत नाही. मे ते जुलै हा त्यांचा प्रजनन काळ असून एकावेळेला घोणस ६ पासून ९६ पर्यंत पिलांना जन्म देते. सापाची पिले अंडय़ातून जन्माला येतात. मात्र घोणस जातीच्या सापामध्ये अंडी मादीच्या पोटातच असतात. ती बाहेर टाकली जात नाहीत. तर पोटातच पिलाचा जन्म होऊन ते बाहेर पडते. कात्रजच्या सर्प उद्यानात घोणसने ७० ते ७२ पिलांना जन्म दिल्याच्या नोंदी आहेत. घोणस साप विषारी असला तरी सहसा तो थेट हल्ला करीत नाही. मात्र आपल्याला धोका आहे असे वाटल्यास प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा तो आवाज करतो. रात्रीच्या वेळी हा साप जास्त सक्रीय असतो. भारतात काश्मिर वगळता सर्वत्र या सापाचे अस्तित्व आढळून येते. जन्माला येताच पिले लहान मोठे भक्ष्य शोधून आपली भूक भागवतात. मोठय़ा प्रमाणात घोणसची मादी पिलांना जन्म देत असली तरी प्रत्यक्षात त्यातील फारच थोडी पिल्ले जगतात. निसर्गाशी संघर्ष करताना बहुसंख्य पिलांचे आयुष्य लहानपणीच संपते.