महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा खान्देश विकास आघाडी सत्ता आपल्याकडे राखण्यात यशस्वी होईल काय, हा प्रश्न शहरातील सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना पडला असताना आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवास सामोरे जावे लागले आहे, तर काही जणांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळविला. खान्देश विकास आघाडीच्या अनेक माजी महापौरांसह उपमहापौरांवर घरकुल घोटाळा प्रकरणात आरोप झालेले असतानाही जळगावकरांनी त्यापैकी काही जणांवर पुन्हा विश्वास दाखवीत निवडून दिले. त्यात आ. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत आघाडीची सूत्रे सांभाळणारे त्यांचे बंधू माजी महापौर रमेश जैन यांचाही समावेश आहे. आघाडीमध्ये आपले अस्तित्व गुंडाळून ठेवणाऱ्या शिवसेनेचे महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांना जळगावकरांनी घरचा रस्ता दाखविला. तर त्याच वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्या मातोश्री व माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
शिवसेना वगळता प्रत्येक प्रमुख पक्ष स्वतंत्ररीत्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने प्रत्येकाला आपली ताकद जोखता आली. त्यात भाजपने बऱ्यापैकी यश मिळविले असले तरी मनसेने मारलेली मुसंडी सर्वानाच चकित करणारी ठरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक-दोन जाहीर सभा घेतल्या असत्या, तर मनसेच्या पदरात अधिक जागा पडल्या असत्या, अशी प्रतिक्रिया राजकीय गोटात व्यक्त होत आहे. शिवसेना खान्देश विकास आघाडीत सामील झाल्याचा फायदा मनसेला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगावकरांच्या दृष्टीने काँग्रेस इतका बेदखल झाला आहे की, त्यांना सलग तिसऱ्या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही.
निवडणुकीतील प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये खान्देश विकास आघाडीचे रमेश जैन, गटनेते नितीन लढदे, माजी महापौर अशोक सपकाळे यांची पत्नी सोयरा सपकाळे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, विद्यमान महापौर किशोर पाटील यांचा समावेश आहे. भाजपचे शहर अध्यक्ष सुरेश भोळे, ज्येष्ठ नगरसेवक वामन खडके हेही विजयी झाले. मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्या मातोश्री सिंधुताई कोल्हे, त्यांचे वडील विजय कोल्हे, खान्देश विकास आघाडीने उमेदवारी नाकारल्याने ऐन वेळी मनसेकडून उभे राहिलेले विद्यमान उपमहापौर मिलिंद सपकाळे यांच्या गळ्यातही विजयश्रीने माळ घातली.
प्रमुख पराभूतांमध्ये खान्देश विकास आघाडीच्या माजी महापौर जयश्री धांडे, माजी नगराध्यक्षा पुष्पावती पाटील, माजी उपनगराध्यक्ष विजय वाणी, आशा सूर्यवंशी, भारती जाधव यांचा समावेश आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख गजानन मालपुरे हेही पराभूत झाले. भाजपचे अशोक लाडवंजारी, चंद्रकांत बेंडाळे, आ. सुरेश जैन यांचे पुतणे मनीष जैन यांना मतदारांनी घरी पाठविले. याशिवाय मनसेचे जमील देशपांडे, राष्ट्रवादीचे इब्राहिम पटेल हे पराभूत झाले.