उपराजधानीतील गुन्हेगारी रोखा
राज्याच्या उपराजधानीत गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंग, बलात्कार, घरफोडी व खुनाच्या घटनासह गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढत असून पोलीस विभागावर आता गृह खात्याचे नियंत्रण राहिले नसल्याचा घरचा अहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना दिला आहे. गृह विभागाच्या एकंदर कार्यशैलीबद्दलच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनातून प्रश्न उपस्थित केले असून आर.आर. पाटील यांना निवेदन सादर केले आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून त्याला पोलिसच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत गृह खात्याचे त्यावर कुठलेच नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. पूर्व नागपुरात गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंग, बलात्कार, घरफोडीचे गुन्हे मोठय़ा प्रमाणात घडले आहेत. पोलीस विभागातर्फे कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनंजय देशमुख, प्रशांत बनकर, प्रशांत लिखनकर, जतीन झाडे आणि अब्दुल कादीर शेख यांनी केला आहे.
शहरात गुन्हे करणारे बहुतांश तेच ते गुन्हेगार असून त्यांना अटक झाल्यानंतर ते जामिनावर सुटतात व पुन्हा शहराच्या काही विशिष्ट भागात दहशत निर्माण करतात. अनेक गुन्हेगारांना पोलीस ठाणे घर-अंगण असल्यासारखे वाटत असल्यामुळे पोलिसांचे त्यांच्यावर नियंत्रण नसल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. एखादा विशिष्ट गुन्हेगार वारंवार एकाच ठाण्यातंर्गत जर गुन्हा करीत असेल तर संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाराला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. वाहतूक विभागाद्वारे दुचाकी वाहनांवर कारवाई केली जात असली तरी चारचाकी वाहनांवर मात्र कारवाई केली जात नाही.
अनेक वाहतूक पोलीस केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसोबत चौकाच्या एका भागात ‘अर्थ’पूर्ण व्यवहारात गुंतलेले असतात त्यामुळे अनेकदा त्यांचे वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे अशा वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कायदे करून आरोपींना शिक्षा करावी आणि पोलिसांवरही नियंत्रण ठेवावे, असे निवेदनात म्हटले आहे.      

Story img Loader