सदैव चच्रेत असलेल्या अर्जुनी मोरगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्याíथनी तेथे पाणी भरत असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटीआयचे प्रशासन ढिसाळ झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीचे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे.
या आयटीआयमध्ये दोन बोअरवेल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्या बंद आहेत, तर नळाची फिटिंग अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्याíथनी येथील शीतयंत्रात पिण्याचे पाणी भरतात, तर रोजंदारीवर नियुक्त केलेला कर्मचारी कधी कधी पाणी भरत असल्याची माहिती आहे. ही अनेक दिवसांपासूनची समस्या आहे. मात्र, आयटीआयकडून यावर कुठल्याच उपाययोजना वरिष्ठांकडून करण्यात आल्या नाहीत. वर्षभरात शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यातच त्यांचा वेळ जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील कारभार सुधारण्याकरिता लोकप्रतिनिधींकडेही वेळ नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच गेल्या वर्षी येथे चांगलाच सावळागोंधळ झाला. शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन आयटीआय प्रशासनाने बँकेत बनावट खाते उघडून फस्त केल्याची बाब उघडकीस आली होती.
येथील प्रशासनावर विश्वास ठेवून वरिष्ठ अधिकारी कामकाज चालवतात त्यामुळेच असे प्रकार सातत्याने घडत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे विद्यार्थी-विद्याíथनी पाणी भरतात किंवा आयटीआयच्या आवाराबाहेर असलेल्या बोअरवेलवर जाऊन पाणी पितात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मानव संसाधन योजनेमार्फत २०११-१२ या वर्षांत शिलाई मशिनचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थीची अद्याप परीक्षा घेण्यात आलेली नाही. या योजनेचा पार बट्टय़ाबोळ केला जात आहे. विद्यावेतन अपहार प्रकरणात येथील प्राचार्य वरकड यांची भंडारा येथे उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर सडक अर्जुनीचे प्राचार्य सी.के. तिवारी यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला. दोन्ही ठिकाणचा प्रभार त्यांच्याकडे असल्यामुळे कुठलेही काम व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे. येथे नियमित प्राचार्य देण्याची मागणी होत आहे. कार्यालयीन कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अंतर्गत दप्तरी कामकाजाची वरिष्ठांनी तपासणी केल्यास येथील गौडबंगाल उघडकीस येऊ शकतो. मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची योजना असली तरी २०११-१२ या सत्रात किमान ५० बाहेरील तालुक्याच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. या संस्थेत दरवर्षी लाखों रुपयांची औजारे, यंत्रसामुग्री खरेदी केली जाते. याचा लेखाजोखा ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती असते. यापूर्वी भट व घडोले हे कर्मचारी येथे दीड वर्षांपूर्वी होते. ते सध्या अन्यत्र बदलून गेले आहेत, मात्र त्यांचा प्रभार सोपवला नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. नवनियुक्त प्राचार्य तिवारी यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना बदलून गेलेल्या ठिकाणी पत्र पाठवले व येथील आयटीआयचा प्रभार तातडीने सोपवण्यास सांगितले, मात्र अजूनही प्रभार सोपवण्यात आल्याचे ऐकिवात नाही. या ठिकाणची यंत्रसामुग्री अस्ताव्यस्त व काही प्रमाणात गहाळ असल्याच्याही चर्चा आहे.
प्रशासन सुधारण्यास वेळ हवा -प्राचार्य तिवारी
गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने शासनाने आयटीआय सुरू केले. तो उद्देश साध्य झाला पाहिजे. काही प्रमाणात कार्यालयीन कामचुकारपणा आहे. ६ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार नाही. येथे पिण्याच्या पाण्याची पर्याप्त व्यवस्था आहे. विद्याíथनींनी बाहेर जाऊन पाणी आणले असल्याची बाब आपल्याला माहिती नसल्याची माहिती प्रभारी प्राचार्य सी.के. तिवारी यांनी दिली.

Story img Loader