दर तिमाहीला किंवा सहामाहीला बाजारात येणाऱ्या नवीन कपडय़ांसोबत तरुणाईमधील पेहरावाचे ट्रेंडही बदलत असतात. पण या सर्व ट्रेंड्सच्या वर्तुळावर मात करून जीन्स पॅण्ट्सनी तरुणाईमध्ये त्यांची लोकप्रियता कायम ठेवली आहे. पण उन्हाळ्यात मात्र या जीन्स घट्ट असल्यामुळे घालायला नकोशा वाटतात. हे लक्षात घेऊन तरुणींच्या सोयीसाठी नेहमीच्या घट्ट जीन्सच्या ऐवजी कॉटनच्या हलक्या, सुटसुटीत आणि रंगीबेरंगी पलॅझो पॅण्ट्स, डंग्रीज आणि जम्पसूट्स असे पॅण्ट्सचे विविध प्रकार बाजारात पहायला मिळू लागले आहेत. प्रवासाच्या दृष्टीने सोयीच्या असल्याने आणि दिसायला आकर्षक असल्याने तरुणींमध्येही हे प्रकार प्रसिद्ध होत आहेत.
फॅशनमधून कधीही हद्दपार न होणारी आणि वेगवेगळ्या पद्धतीने घालता येणाऱ्या जीन्स तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. पण उन्हाळ्यामध्ये मात्र याच जीन्स घामाला आमंत्रण देत असल्यामुळे घालायला नकोशा वाटतात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या आगमनासोबतच जीन्ससाठी वेगळे पर्याय शोधण्यासाठी तरुणांच्या नजरा बाजारात फिरू लागतात. यंदा मात्र या जीन्सना पर्याय म्हणून तरुणींसाठी बाजारात पलॅझो पॅण्ट्स, डंग्रीज, जम्पसूट्सची मोठी विविधता पहायला मिळत आहे. कॉटनच्या या पॅण्ट्सचे हे प्रकार तरुणींमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आहेत. सुटसुटीत पलॅझोसोबत गंजी किंवा रंगीत टी-शर्ट या पोशाख महाविद्यालयीन तरुणींमध्ये आपलासा होऊ लागला आहे. फॅशन स्ट्रीटपासून ते मॉल्सपर्यंत विविध प्रिंट्सच्या, रंगीत पलॅझो पॅण्ट्स पहायला मिळू लागल्या आहेत.
घालायला सोयीच्या आणि सुटसुटीत असल्यामुळे नुकत्याच झालेल्या फॅशन वीक्समध्येही डिझायनर्सनी या पॅण्ट्सना पसंती दिली होती. जीन्सप्रमाणेच या पॅण्ट्ससोबतसुद्धा कुर्ता, टि-शर्ट्स, शर्ट्स घालता येतात. या वेळी प्रिंट्समुळे पाश्चात्त्य तसेच भारतीय पद्धतीच्या पेहरावात हे शोभून दिसतात. नेहमीच्या जीन्समुळे येणाऱ्या लुकपेक्षा या पॅण्ट्सचा लुक वेगळा असतो. त्यामुळे या पॅण्ट्ससोबत प्रयोगाला पूर्ण वाव असतो. टी-शर्ट्स, शर्ट्ससोबत पलॅझो पॅण्ट्स घातल्यास ऑफिसला घालायला सोयीचा पाश्चात्त्य लुक मिळतो. तर कुर्त्यांसोबत घातल्यास भारतीय पेहरावाचा लुक मिळतो. सोबत स्कार्फ, दुपट्टा, जॅकेट्ससोबत लुकमध्ये विविधता आणता येते. आकाराला रुंद असल्यामुळे स्कर्टचा लुकसुद्धा या पॅण्ट्सना मिळतो. बाजारात ५०० रुपयांपासून या पलॅझो पॅण्ट्स उपलब्ध आहेत, तर डंग्रीज आणि जम्पसूट्सची किंमत ७०० रु.पासून सुरू होते.
उन्हाळ्यासाठी जीन्सऐवजी तरुणींची कॉटन पॅण्ट्सना पसंती
दर तिमाहीला किंवा सहामाहीला बाजारात येणाऱ्या नवीन कपडय़ांसोबत तरुणाईमधील पेहरावाचे ट्रेंडही बदलत असतात.
First published on: 15-04-2015 at 06:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls prefer cotton pants rather than jeans