विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत कळकळीने बोलत होते. परंतु सत्तेत आल्यावर विधानसभा आणि विधान परिषदेत आश्वासन देऊनही ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे सहा लाख रुपये उत्पन्न मर्यादेचे परिपत्रक काढत नाहीत. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याचे टाळत आहेत.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने निवेदन देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे याविषयाकडे लक्ष वेधले आहे. पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी तातडीने परिपत्रक काढणे आवश्यक आहे. पुढच्या महिन्यापासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रारंभ होणार आहे. जर मे महिन्यात यासंदर्भातील परिपत्रक सरकारने काढले नाही तर ओबीसी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात कुठलाच लाभ मिळणार नाही. लाख-लाख रुपये शुल्क भरावे लागले. अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. तेव्हा चालू महिनाअखेपर्यंत शासकीय परिपत्रक काढण्यात न आल्यास परिषदेच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे पूर्व विदर्भाचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना विरोधीपक्षात असताना विधानसभेत केलेल्या मागण्यांची आठवण देखील परिषदेने करून दिली आहे. विरोधीपक्षात असताना फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१२ रोजी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी क्रिमीलेयर प्रमाणे सहा लाख रुपये उत्पन्नमर्यादा करावी म्हणून लक्षवेधी लावली. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी ती मागणी मान्य केली. पण त्याची पूर्तता करणारा आदेश आघाडी सरकारने काढला नाही. त्यानंतर २० डिसेंबर २०१२ ला तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ओबीसी विद्यार्थ्यांनाही एससी, एसटीप्रमाणे १०० टक्के शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणी विधानसभेत केली. पण त्यावेळी ती अमान्य झाली. आज हे दोघेही नेते मंत्री आहेत. त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दाला जागून उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये आणि १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा आदेश काढावा, असे परिषदेने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा