गोंदिया जिल्हा भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीसह सामान्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्य़ातील सर्व बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर आíथक मदत देण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हा भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
हा जिल्हा धान पिकांसाठी प्रसिद्ध असून येथील शेतकरी, शेतमजुरांचे आíथक उत्पन्नाचे हे मुख्य साधन आहे. मात्र, जून व जुलमध्ये जिल्ह्य़ात सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने धान पेरणीची मोठी नासाडी होऊन ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी याबाबत औपचारिकताच निभावल्याचा देखावा केला आहे. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्य़ात कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना मोठा फटका बसला असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तसेच जिल्ह्य़ातील नदी, नाले व धरण ओसंडून वाहत असल्याने अनेक गावे व वस्तीत पाणी शिरल्याने शेकडो घरे व गोठय़ांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याशिवाय, जिल्ह्य़ातील अनेक रस्ते व तलावांची दुरवस्था होऊन अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात नसíगक संकट आले असताना मुख्यमंत्र्यांनी २७ जुलला विदर्भात धावता दौरा केला. मात्र, या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची विदारक स्थिती बघण्यासाठी त्यांना सवड मिळाली नाही. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी. पावसामुळे आपदग्रस्त कुटुंबांना तातडीने नुकसानभरपाई देऊन घरकूल बांधून देण्यात यावे, रस्ते, तलाव व इतर जनमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा, रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात यावीत, अशा मागण्यांचे निवेदन भाजपने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या मागण्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, माजी आमदार केशव मानकर, भेरसिंग नागपुरे, दयाराम कापगते, हेमंत पटले, माजी अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, सभापती मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, सविता पुराम, कुसन घासले आदी उपस्थित होते.
पूरबळींना अडीच लाखाची मदत -डॉ. सनी
भाजपच्या शिष्टमंडळाने केलेल्या चच्रेनंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी सांगितले की, जिल्ह्य़ातील १४० रस्ते खराब झाल्याची माहिती शासनाकडे पाठवली आहे. या रस्ते दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. याशिवाय, अतिवृष्टीमुळे घर व गोठय़ांचे अंशत: नुकसान व पडझड झाली असून याकरिता ५ लाखाचा निधी उपलब्ध आहे, तर ४० लाख मंजूर झाले आहेत. जिल्ह्य़ात पुरामुळे दोन लोकांचा बळी गेला असून केंद्र शासनाकडून दीड लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख, अशी अडीच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पावसाने धानाची रोपे खराब
जिल्ह्य़ातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दोन दिवस पावसाने काही अंशी उघडीप दिल्यानंतर बुधवारी पुन्हा संततधार पाउस सुरू असल्याने शेतक-यांसह सखल भागातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. संजय सरोवर जलाशय व पुजारीटोला जलाशयातून पाणी सोडल्यामुळे गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाघ नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. या जिल्ह्य़ातील प्रकल्पांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. पावसामुळे जीवित व आर्थिक हानी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरापासून शेताच्या बांध्यात पाणी साचून असल्यामुळे भात पिकांची रोपे खराब झाली आहे. काही ठिकाणी पऱ्हे वाहून गेली.