गोंदिया जिल्हा भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीसह सामान्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्य़ातील सर्व बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर आíथक मदत देण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हा भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
हा जिल्हा धान पिकांसाठी प्रसिद्ध असून येथील शेतकरी, शेतमजुरांचे आíथक उत्पन्नाचे हे मुख्य साधन आहे. मात्र, जून व जुलमध्ये जिल्ह्य़ात सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने धान पेरणीची मोठी नासाडी होऊन ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी याबाबत औपचारिकताच निभावल्याचा देखावा केला आहे. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्य़ात कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना मोठा फटका बसला असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तसेच जिल्ह्य़ातील नदी, नाले व धरण ओसंडून वाहत असल्याने अनेक गावे व वस्तीत पाणी शिरल्याने शेकडो घरे व गोठय़ांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याशिवाय, जिल्ह्य़ातील अनेक रस्ते व तलावांची दुरवस्था होऊन अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात नसíगक संकट आले असताना मुख्यमंत्र्यांनी २७ जुलला विदर्भात धावता दौरा केला. मात्र, या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची विदारक स्थिती बघण्यासाठी त्यांना सवड मिळाली नाही. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी. पावसामुळे आपदग्रस्त कुटुंबांना तातडीने नुकसानभरपाई देऊन घरकूल बांधून देण्यात यावे, रस्ते, तलाव व इतर जनमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा, रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात यावीत, अशा मागण्यांचे निवेदन भाजपने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या मागण्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, माजी आमदार केशव मानकर, भेरसिंग नागपुरे, दयाराम कापगते, हेमंत पटले, माजी अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, सभापती मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, सविता पुराम, कुसन घासले आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा