शेतीमध्ये भारत स्वयंपूर्ण होऊन साखर, कापूस, गहू व मत्स्य या व्यवसायात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मत्स्यउत्पादनात जगात अव्वल नंबर प्राप्त करण्यासाठी या विद्यापीठाच्या महाविद्यालयातून माशाच्या विविध जातींचे उत्पादन वाढवावे. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करून प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत चालणाऱ्या मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर येथे नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, लातूर जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार डॉ. सुधाकर भालेराव, आमदार श्रीपतराव पाटील मुरूमकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार वैजनाथ िशदे, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, पशुसंवर्धन सचिव अनिल डिग्गीकर, कुलगुरू प्रा. आदित्यकुमार मिश्रा, बसवराज पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, डी. एन. शेळके, संजय बनसोडे, सहयोगी अधिष्ठाता बी. आर. खरोटमोल यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पवार म्हणाले, अन्नसुरक्षा कायदा हा ग्रामीण भागातील ८० टक्के शेतकऱ्यांना फायद्याचा आहे. याला कितीही विरोध झाला तरी तो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलेला कायदा आहे. अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी मासे हा उत्तम व्यवसाय असून जगाच्या पाठीवर आपण माशांची मोठय़ा प्रमाणात विक्री करतो. ६५ टक्के माशांचे धरण, तलावातून उत्पादन केले जाते तर ३५ टक्के माशांचे सागरातून उत्पादन केले जाते. त्यामुळे हा उद्योग ग्रामीण भागात वाढवला गेला पाहिजे. विद्यापीठाने मत्स्य व्यवसाय कसा वाढेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या उपकेंद्रात सोयी-सुविधांसाठी केंद्र शासनाकडून मुलींसाठी वसतिगृह व मेस, मुलांसाठी वसतिगृह व मेस व सेंट्रल लायब्ररीसाठी येत्या अंदाजपत्रकात तरतूद करून जास्तीत-जास्त हा निधी विद्यापीठाला दिला जाईल. तो निधी इतरत्र न वळवता उदगीरसाठीच खर्च करावा, असे आदेश त्यांनी विद्यापीठाला दिले. वाढत्या महागाईला डिझेल व पेट्रोल दरवाढच कारणीभूत आहे. जोपर्यंत पेट्रोल व डिझेलच्या किमतीवर नियंत्रण मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना जास्तीचाच भाव द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
मधुकर चव्हाण म्हणाले, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात उपक्रम सुरू करण्यासाठी शरद पवारांनी लक्ष घालावे. गुजरातसारख्या राज्यात दुग्धविकास निगम स्थापन करून जसा विकास केला, तसा महाराष्ट्रात विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली. विलासराव देशमुखांची आठवण काढून त्यांनी या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ विलासरावांनी रोवली, असे सांगितले. देवणी गाय, देवणी वळू यांनी २३ वेळेस भारतात पशुप्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनुवंशिकता जपण्याच्या माध्यमातून या विद्यापीठाने मोठे लक्ष दिले आहे.
यावेळी आ. सुधाकर भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू प्रा. आदित्यकुमार मिश्रा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मत्स्यगंधा पाटील व डॉ. पी. एच. पवार यांनी केले तर आभार सहयोगी अधिष्ठाता बी. आर. खरटमोल यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा