सफाई आयोगाच्या सदस्याची मागणी
सोनईतील तिहेरी हत्याकांड
सोनई येथील दलित समाजातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासात स्थानिक पोलिसांनी दिशाभूल केली आहे, यामध्ये धनदांडग्यांचा सहभाग आहे. तपास सीआयडीकडे दिले असले तरी त्यामागे प्रकरण दपण्याचाच उद्देश आहे. आरोपी केवळ सात नाहीत, गुन्ह्य़ात किमान १५ ते २० जणांचा समावेश आहे, त्यामुळे गुन्ह्य़ाचे कटकारस्थान उघडकीस आणण्यासाठी तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी आपण पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य श्यौराज जीवन यांनी आज पत्रकारांना सांगितले.
आोगाच्या अध्यक्ष कमलाबेन गुर्जर यांच्या सूचनेनुसार आपण सोनईतील हत्याकांडामुळे भेट देण्यासाठी आलो आहोत, असे सांगुन श्यौराज जीवन यांनी सांगितले की, आरोपींना समाजाची सहानुभुती मिळावी यासाठीच पोलीसांनी या प्रकरणाला प्रेमप्रकरणाचा रंग दिला. परंतु इतर दोघांची हत्या करण्याचे कारण काय, ज्या भीषण पद्धतीने हत्याकांड करण्यात आले त्याचा उद्देश काय, तीघांची हत्या सात जण करु शकत नाहीत, यामध्ये किमान १५ ते २० जण असावेत, असा संशय आहे.
मृत दलित समाजाचे आहेत म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, उच्च वर्गातील असते तर समाजाने सरकार हलवले असते, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदल्या झाल्या असत्या, परंतु सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजात आवाज उठवणारे कोणी नाही, म्हणुन दखल घेतली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
श्यौराज जीवन हत्याकांडाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते, मात्र प्रत्यक्षात ते घटनास्थळी गेलेच नाहीत, असे चौकशी करता सांगण्यात आले. जीवन यांनी जिल्ह्य़ातील सफाई कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, परंतु या बैठकीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता दुय्यम अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचा आक्षेप घेत जीवन यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.