जायकवाडीत पाणी जाण्यास आपला विरोध नाही. पण, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून चार आवर्तने द्यावीत. शेती व पिण्याच्या पाण्याचे एकत्रित आवर्तन करावे, अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिला.
पाणीप्रश्नावर प्रथमच त्यांनी अनेक वर्षांनंतर मोर्चा काढला. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. मोर्चाचे रुपांतर जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर सभेत झाले. यावेळी देखरेख संघाचे इंद्रनाथ थोरात, अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे, सभापती सुनिता बनकर, उपसभापती कैलास कणसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुभाष पटारे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, जायकवाडीत २६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार नऊ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार आहे. या पाण्याचा पिण्यासाठीच वापर होईल का याबाबत संशय आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केलेल्या मागणीबाबत आपल्याला वेगळा हेतू दिसतो. त्यांचा बराचसा ऊस जायकवाडीच्या पाण्यावर आहे. प्रवरा संगमपासून जायकवाडीपर्यंत उपसा योजनेद्वारे शेतीसाठी पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे सोडलेले पाणी पिण्याऐवजी शेतीसाठी वापरले जाईल असे झाल्यास आपल्याला आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
जायकवाडीत तीन टीएमसी पाणी गेल्याने विशेष फरक पडणार नाही. पण, उरलेल्या १० टीएमसी पाण्याचे नियोजन करावे, दर साठ दिवसांनी आवर्तन करावे. शेतीसाठी पहिले २५०० दशलक्ष घनफूट, दुसरे २२०० दशलक्ष घनफूट, तिसरे २१५० दशलक्ष घनफूट व चौथे २१५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन शेतीसाठी करावे. उर्वरित एक टीएमसी पाणी मे नंतर पाऊस लांबल्यास उपयोगी पडेल, असे ते म्हणाले.
अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात चांगला भाव दिला आहे. चालू गळितातही जिल्ह्यातील अन्य कारखान्यांपेक्षा चांगला भाव देऊ. शेतकरी संघटनांचे काही नेते पगारी असून त्यांना कांबळे, ससाणेंची फूस आहे. सभासद व शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे गळीत चांगले होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक आहे. त्यामुळे भाव चांगला देणारच, अशी टिपण्णीही त्यांनी केली. जलसंपदा विभागाचे उपअभियंता सुखदेव थोरात यांनी धरणातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षित केले आहे. त्यांच्याकडे शेतीसाठी आवर्तन सोडविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. मुरकुटे यांचा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवला जाईल, असे सांगितले.
यावेळी काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय डाकले, थोरात, मल्लू शिंदे, सभापती बनकर, मंजाबापू थोरात, सखाहारी शिंदे, बाळकृष्ण फोपसे यांची भाषणे झाली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा