राज्य शासनाने एनपीएमध्ये आलेल्या राज्य सहकारी बँका व जालना, नांदेड, उस्मानाबाद, नंदुरबार, धुळे इत्यादी सहकारी बँकांना शेतकऱ्यांच्या बँका म्हणून मदत देऊन या बँका वाचविण्याचे काम केले. परंतु विदर्भातीलच बुलढाणा, नागपूर व वर्धा या ३ जिल्हा सहकारी बँकांना शासनाने कोणतीही मदत दिली नाही. विदर्भाबाबत शासनाचे उदासीन धोरण यावरून सिद्ध होते. तरी राज्य शासनाने राज्यातील इतर बँकांच्या धरतीवर या बँकांनाही मदत देऊन बँक वाचविण्याचे काम करावे, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरणे आंदोलनप्रसंगी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके यांनी सांगितले की, आमच्या नेतृत्व व पक्षावर काही लोक हेतूपुरस्कर गैरसमज निर्माण करण्याचे षडयंत्र करीत आहेत. वारंवार खोटे आरोप करून आम्हांला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  यापुढे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू व नेतृत्वावरील चुकीचे हल्ले सहन केले जाणार नाही, असे रोखठोक मत व्यक्त केले. या धरणे आंदोलनास जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती लक्ष्मी शेळके, जिल्हा परिषद सदस्या सुलोचना पाटील, रेखा सावजी जाधव, महिला तालुकाध्यक्षा आशा पवार, पं. स. उपसभापती बबलुशेठ, नगरसेवक मो.सज्जाद, अग्रवाल, पं.स. सदस्य नाईक, जाधव, अनिता शेळके, भोंडे, तायडे, रायपुरे, सुनीता सावळे, पाटील, डी. एस. लहानेसर, एस. टी. सोनुने, जुमडे, दत्ता नारखेडे, गजानन जंगले उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर भास्करराव शिंगणे यांच्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतील प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाची सांगता झाली.

Story img Loader