‘वेकोलि’मध्ये उत्पादन उत्पादकता वाढविण्यासोबतच सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असे आवाहन वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी.सी. गर्ग यांनी केले. वेकोलिच्या इंदोरा कॉम्प्लेसच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वेकोलिने चालू आर्थिक वर्षांत काही अडचणींमुळे निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी उत्पादन केले आहे. तथापि, केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांनी प्रोत्साहित करून कोळसा उत्पादनाचे लक्ष्य प्राप्त करण्याचे आवाहन केले आहे, असे सांगून अध्यक्ष गर्ग यांनी कंपनीच्या उत्पादनात वाढ होत असताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. उत्कृष्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांनी पुरस्कार प्रदान केले. सवरेकृष्ट सुरक्षा व्यवस्थेसाठी ब्रिगेडियर एम.व्ही. वडके ट्रॉफी वेकोलिच्या वणी विभागाला प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर झंकार महिला मंडळाच्या अध्यक्ष शशी गर्ग, उपाध्यक्ष शोभा प्रकाश, डॉली दयाल उपस्थित होत्या. वेकोलिच्या बॅण्ड, कमांडोंच्या कवायतीनंतर संगीत खुर्ची व रस्सीखेचमध्ये कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. विविध विभागाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे संचालन कार्मिक विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर.डी. गेडाम यांनी केले.
‘दि धरमपेठ महिला’ची मासिक उत्पन्न योजना
दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक उत्पन्न योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र टोळे यांच्या हस्ते झाले. या योजनेत १५ महिन्यांच्या ठेवीवर दरमहा ११ टक्के दराने व्याज दिले जात आहे. एक लाख रुपयांच्या ठेवीवर दरमहा ९१७ रुपये व्याज दिले जात आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी सर्व शाखांमध्ये राबविण्यात येत आहे. दि धरमपेठ महिला सोसायटी ज्येष्ठ नागरिक, सभासद व ग्राहकांचा विचार करून योजनेची सुरुवात करीत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मोलाची ठरणार असून त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन टोळे यांनी  केले. कार्यक्रमाला पद्माकर खरे, संस्थेच्या संचालिका निलम बोवाडे, संस्थेचे व्यवस्थापकीय सल्लागार प्रताप हिराणी, ज्येष्ठ व्यवस्थापक ताटके, सावजी, बारापात्रे, शाखा व्यवस्थापक पालांदूरकर, सहायक व्यवस्थापक चंद्रशेखर वसुले, ज्येष्ठ खातेदार व कर्मचारी उपस्थित होते.
महाबँकेच्या हनुमाननगर शाखेच्या एटीएमचे उद्घाटन
बँक ऑफ महाराष्ट्रच्या हनुमाननगर शाखेच्या एटीएमचे उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे विभागीय व्यवस्थापक नंदकुमार पुजारी व डॉ. शेगोकार उपस्थित होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.एल. कर्ण यांनी शाखेद्वारे ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सुविधांची माहिती दिली. या एटीएममुळे मेडिकलच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार असल्याचे डॉ. पोवार म्हणाले. बँकेने महाबँक कार्पोरेट रेरोल खाते योजना नुकतीच आरंभ केली आहे. या योजनेमध्ये तीन महिन्यांच्या निव्वळ पगारएवढी ओव्हरड्राप्ट सुविधा, विनाशुल्क एनइएफटी सुविधा, वाहन व गृह कर्ज प्रक्रिया शुल्कांमध्ये ५० टक्के सवलत, सोयीस्कर पेरोल व्यवस्थापन आदी सुविधा देण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद माकडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा