मूलभूत सुविधांसाठी आंदोलन – दानवे
शहरातील गुंठेवारीच्या संचिका मोठय़ा प्रमाणात प्रलंबित असल्याने सहा प्रभागांतील वॉर्ड अभियंत्यांना गुंठेवारी नियमित करण्याचे अधिकार द्यावेत, अशी सूचना महापौर कला ओझा यांनी केली तर मूलभूत सुविधा न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. गुंठेवारीच्या अनुषंगाने मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व सदस्यांसह विशेष बैठक घेण्यात आली. शिवसेनेचे संपर्कनेते विश्वनाथ नेरूरकर या वेळी उपस्थित होते.
११८ गुंठेवारी वसाहतीचे सूक्ष्म नियोजन करा व गुंठेवारी नियमित करण्यास शिबिरे घ्यावीत, अशी सूचना नेरूरकर यांनी केली. उल्हासनगर महापालिकेत झाले, तसेच काम येथे व्हावे व गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांना सुविधा देण्यास वचनबद्ध असल्याचे नेरूरकर यांनी सांगितले. नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी २००१ पूर्वीची घरे नियमित व्हावीत, तसेच चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासंदर्भात अभ्यास करावा व आरक्षणाचे मार्किंग करून मोकळ्या भूखंडांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. सुरेंद्र कुलकर्णी, सूर्यकांत जायभाय, पुष्पा सलामपुरे यांनी खासगी एजन्सीमार्फत गुंठेवारी क्षेत्राचे सर्वेक्षण करावे, अशी सूचना केली.
अनेक नागरिकांनी गुंठेवारीअंतर्गत संचिका दाखल केल्या. त्यावर निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. अंतर्गत रस्त्यावर घरासमोर वाढीव बांधकाम करून रस्ते अरुंद झाले आहेत. ते अतिक्रमण तातडीने दूर करावेत. नागरिकांनी गुंठेवारी शुल्काचा भरणा करावा. जेथे गुंठेवारी शुल्क भरले असेल त्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दानवे यांनी दिला. प्रास्ताविक मनपा सभागृहनेते रेणुकादास वैद्य यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा