नाताळाच्या कालावधीत होणारा आणि देशी-परदेशी पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आणि आकर्षणाचा विषय असलेला गोव्याचा विख्यात ‘कार्निव्हल महोत्सव’ आता फेब्रुवारीतही भरणार आहे. गोवा पर्यटन विभागाच्या पुढाकारातून ८ फेब्रुवारीपासून पाच दिवसीय कार्निव्हल सुरू होत असून गोव्याची संस्कृती, परंपरा दर्शवणाऱ्या कार्यक्रमांसह खाण्यापिण्याचा मनमुराद आनंद या कालावधीत पर्यटकांना लुटता येईल.
गोव्यातील संमिश्र संस्कृती, परंपरा दर्शवणारा आणि धमाल कार्यक्रमांचा समावेश असलेला ‘गोवा कार्निव्हल, फूड अँड कल्चरल फेस्टिवल २०१३’ आठ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१३ या पाच दिवसांत होणार आहे. पणजीतील कॅरांझेलम येथील एनआयडब्ल्यूएस मैदानावर खाद्य व सांस्कृतिक महोत्सव भरेल. तर या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ ९ फेब्रुवारी रोजी पणजीतील बांदोडकर मार्गावर होईल. त्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री चिरंजीवी हे उपस्थित राहणार आहेत.
पणजीबरोबरच मडगाव, वास्को व म्हापसा या चार शहरांत कार्निव्हलची धूम असेल. या सर्व ठिकाठी विविध प्रकारच्या ‘फ्लोट्स’ची भव्य मिरवणूक निघणार आहे. ‘कम टुगेदर’ अशी हाक त्यासाठी देण्यात आली आहे.
महोत्सवाच्या कालावधीत प्रख्यात गायक रेमो फर्नाडीस याच्यासह अनुष्का मनचंदा, परिक्रमा, इंडियन ओशन अशा नामांकित बँड्चे कार्यक्रम होतील. शिवाय वेंडेल रॉड्रिक्स यांचा फॅशन शो, पाककला स्पर्धा अशा कार्यक्रमांची रेलचेल या पाच दिवसांत असेल. अस्सल गोव्याच्या चविष्ट खाद्यपदार्थासह आणि इतर प्रांतांच्या खाद्यपदार्थाचा आस्वादही यावेळी पर्यटकांना घेता येईल.
नाताळ आणि नववर्षांच्या दरम्यान होणाऱ्या गोव्यातील कार्निव्हलसाठी देशी-परदेशी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हॉटेल्स आणि निवासाच्या विविध सोयी खूप आधीपासूनच आरक्षित होतात. लाखो लोकांना त्यामुळे मनात असूनही कार्निव्हलचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणे शक्य होत नाही. त्यामुळे आता वर्षांतील इतर महिन्यांमध्येही कार्निव्हलसारखे पर्यटकांना आकर्षित करणारे महोत्सव भरवून पर्यटकांना गोवा दर्शनाची चांगली संधी उपलब्ध करून द्यायची आणि पर्यटन उद्योगाला चालना द्यायची असा निर्णय गोवा सरकारने घेतला असल्याचे गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तर कार्निव्हलसाठी बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती असणार आहे. नेहा धुपिया, सायली भगत, तनुश्री दत्ता आदी कलावंत मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती पर्यटन विभागाचे संचालक निखिल देसाई यांनी दिली. अडीच ते तीन लाख लोक या महोत्सवासाठी हजेरी लावतील असा प्राथमिक अंदाज आहे.
गोव्याचा ‘कार्निव्हल महोत्सव’ आता फेब्रुवारीतही
नाताळाच्या कालावधीत होणारा आणि देशी-परदेशी पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आणि आकर्षणाचा विषय असलेला गोव्याचा विख्यात ‘कार्निव्हल महोत्सव’ आता फेब्रुवारीतही भरणार आहे. गोवा पर्यटन विभागाच्या पुढाकारातून ८ फेब्रुवारीपासून पाच दिवसीय कार्निव्हल सुरू होत असून गोव्याची संस्कृती, परंपरा दर्शवणाऱ्या कार्यक्रमांसह खाण्यापिण्याचा मनमुराद आनंद या कालावधीत पर्यटकांना लुटता येईल.
First published on: 28-01-2013 at 11:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goas carnival mahotsav now in february also