मनमाड रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३५ वाजता सुटणाऱ्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस गाडीला थांबवून मुंबईकडे जाणाऱ्या दोन हॉलिडे सुपरफास्ट एक्सप्रेस गाडय़ांना पुढे मार्गस्थ करण्यात आल्यामुळे गोदावरी एक्स्प्रेसला पुन्हा एकदा विलंब झाला. यामुळे संतप्त झालेल्या चाकरमानी आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत जोरदार निदर्शने केल्यामुळे स्थानकात खळबळ उडाली. त्यातच शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रवाशांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न पोलीस व सुरक्षा दलाने केल्यामुळे प्रवासी अधिक भडकले. या घडामोडीनंतर अखेर ४५ मिनिटांच्या विलंबानंतर गोदावरी एक्स्प्रेस नाशिकरोडकडे मार्गस्थ झाली.
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसला मिळणारे उत्पन्न कमी असल्यामुळे ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ येथून सोडण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळेच या गाडीला सापत्नभावाची वागणूक दिली जाते. बुधवारी सकाळी घडलेला प्रकार हा त्याचाच एक भाग असल्याची प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. सकाळी गोदावरी एक्स्प्रेस फलाट क्रमांक चारवर उभी होती. या रेल्वे गाडीने नाशिक येथे नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी हजारो नागरिक, विद्यार्थी तसेच प्रवासी प्रवास करतात. बुधवारी नियोजित वेळ होऊनही गाडी सुटली नाही. पण, गोदावरीला थांबवून मुंबईकडे जाणाऱ्या दोन सुपरफास्ट हॉलीडे एक्स्प्रेस गाडय़ा एका पाठोपाठ सोडण्यात आल्या. परिणामी, सुपरफास्ट असूनही गोदावरीला थांबवून ठेवले. यामुळे गाडी सुटण्यास विलंब झाला. गोदावरीची वेळ होऊनही मुंबईकडे जाणाऱ्या दोन गाडय़ा का सोडण्यात आल्या, असा प्रश्न संतप्त प्रवाशांनी केला. या वेळी ४००-५०० प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही वेळातच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घोषणा देणाऱ्या प्रवाशांचे चित्रीकरण सुरू केल्यामुळे आंदोलन अधिकच भडकले. आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना चित्रीकरण करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. दरम्यान, स्थानक अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची समजूत काढली. या आंदोलनामुळे गोदावरी एक्स्प्रेस सुमारे ४५ मिनिटे विलंबाने म्हणजे ९.२० वाजता मार्गस्थ झाली.

Story img Loader