*  एकलहरे बंधाऱ्याच्या चाचणीसाठी उधळपट्टी
*  प्रदुषणविरोधातील कारवाई थंड
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे सर्वत्र गंभीर टंचाईचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे एकलहरे औष्णिक वीज केंद्रातर्फे बंधाऱ्याच्या दरवाजाच्या चाचणीसाठी पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याचे पुढे आले आहे. संबंधितांना देण्यात येणारे पाणी त्यांच्या आरक्षणाचा भाग असले तरी पाण्याविना सर्वसामान्य हवालदिल झाले असताना केंद्रामार्फत दरवाजांची चाचणी करण्यासाठी ऐन दुष्काळात १५० दशलक्ष घनफूट पाण्याचा विनियोग केला जात आहे. यामुळे भर उन्हाळ्यात गोदापात्र दुथडी भरून वाहत असून त्यात हात धुवून घेण्याची संधी नागरिकांनी सोडलेली नाही. खुद्द पोलीस आयुक्तांनी काढलेल्या फर्मानाकडे दुर्लक्ष करत अनेकजण पात्रात वाहन व कपडे धुवून प्रदुषणात भर टाकत असताना स्थानिक पोलीस ठाण्यांनी त्याकडे कानाडोळा करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
एकलहरे औष्णीक वीज केंद्राला गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पासाठी दरवर्षी काही विशिष्ट प्रमाणात पाणी आरक्षित केले जाते. नदीपात्राद्वारे हे पाणी वीज केंद्राच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचविले जाते. या बंधाऱ्यातील दरवाजांच्या दुरूस्तीचे काम पूर्णत्वास गेल्यावर त्याची चाचणी घेण्यासाठी सात दिवसांपासून गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
या चाचणीदरम्यान हजारो लिटर पाणी आधीच वाया गेले आहे. असे असूनही संबंधित वीज प्रकल्पास पाणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवाजांच्या चाचणीसाठी एकलहरेला पाणी सोडण्यात आल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिली. त्याकरिता सात दिवसांपासून धरणातून ३५० क्युसेक्सने सोडलेले पाणी मंगळवारी सायंकाळपासून ५०० क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आले आहे. गुरूवापर्यंत संबंधितांना एकूण १५० दशलक्ष घनफूट पाणी दिले जाणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. वीज केंद्रासाठी आरक्षित हे पाणी असून ते दिल्यानंतरही केंद्राचे १५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. नाशिक जिल्ह्यात शेकडो गावे व वाडय़ांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अशी स्थिती असताना एकलहरे वीज केंद्र दरवाजाच्या चाचणीसाठी पाण्याची नासाडी करत असल्याची स्थानिकांची भावना आहे.
एकलहरे वीज केंद्राला १५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यासाठी धरणातून त्याहून जवळपास दुप्पट पाणी सोडावे लागते. त्यात गोदावरी पात्रातील सुमारे २२ किलोमीटरच्या प्रवाहात पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होईल. शिवाय, गतवेळप्रमाणे चाचणीवेळीही पुन्हा हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याची साशंकताही स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदापात्र सलग सात दिवसापासून दुथडी भरून वाहत आहे. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, गोदावरीला प्रदुषणाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली जात आहे. गटारींचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने गोदावरीची अवस्था बिकट झाली आहे. या कारणास्तव उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी गोदापात्रात कपडे धुणे, वाहनांची स्वच्छता करणे आदी प्रकारांना लगाम घालण्यासाठी कारवाईचा इशारा दिला होता. प्रारंभीचे काही दिवस पोलीस ठाण्यांनी या पद्धतीने वाहनचालक व नागरिकांवर कारवाई केली. परंतु, कारवाईत सातत्य न राखल्याने  गोदावरी प्रदुषित करण्याचे उद्योग पुन्हा जोमात सुरू असल्याचे पहावयास मिळते. पोलिसांची तमा न बाळगता बुधवारी सकाळपासून गोदापात्रात अनेक नागरिकांकडून वाहने धुण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू होते. त्याच पद्धतीने कपडेही धुतले जात होते.
पोलिसी कारवाई थंडावल्याने प्रदुषणाला हातभार लावण्याचे उद्योग सुरू झाले असताना महापालिका स्थितप्रज्ञच्या भूमिकेत आहे. २०१३ हे प्रदुषण मुक्त म्हणून साजरे करण्याची घोषणा करणाऱ्या पालिकेच्या पर्यावरण विभागाने ‘गोदापात्रात कोणी निर्माल्य टाकल्यास अथवा कपडे वा वाहने धुतल्यास पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल’ असे काही फलक बसविण्यात धन्यता मानली. न्यायालयाने कारवाईची जबाबदारी पोलिसांवर टाकल्याने पालिका नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.