मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवली. पाण्याअभावी दोन वर्षांपासून हातची पिके गेली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आíथक नुकसान होऊ लागले आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाणीसमस्येवर उपाय शोधत कांदा पिकासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. मराठवाडय़ातील कांद्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्याच्या अपसिंगा पट्टय़ात ठिबकच्या माध्यमातून कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, कामठा, कात्री, ढेकरी परिसरात कांदा व शेतकरी हे समीकरणच रुढ झाले आहे. अपसिंगा, कामठा, कात्री, ढेकरी आदी गावांच्या शिवारात दरवर्षी सुमारे ६०० ते ७०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते. अपसिंगा शिवारात सर्वाधिक सरासरी ४०० हेक्टर जमिनीवर ही लागवड केली जाते. यंदा या भागात बऱ्यापकी पाऊस झाल्याने लागवड क्षेत्रात सहा ते सात टक्क्यांची वाढ होईल, असे चित्र आहे.
कांद्याच्या पिकाने आíथक समृद्धीचा मार्ग दाखविलेल्या या परिसरातील शेतकरी नफा, नुकसान, यशापयश पचवून दरवर्षी कांद्याचे पीक घेतात. कांद्याच्या पिकाला एक प्रकारचा ‘जुगार’ मानले जाते. अधिक उत्पादन होण्यामुळे बाजारात दर कोसळून कांदा उत्पादकांचा जुगार फेलही ठरतो. मात्र, अपुरा पाऊस व कमी उत्पादन झालेल्या हंगामात समाधानकारक दर राहिल्यानंतर कांदा उत्पादकांना भरघोस आíथक फायदाही होतो. मागील वर्षी बाजारपेठेत दर चांगले होते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईचा फटका बसला. तरीही या परिसरात गतवर्षीच्या हंगामात सरासरी २० कोटींहून अधिक पसा कांद्याच्या माध्यमातून कांद्याच्या कोठारात आल्याचे म्हटले जाते.
अपसिंगा भागातील कात्री येथे प्रकाश गोरे, बालाजी िशदे, नेताजी देशमुख, दीपक देशमुख यांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेण्याच्या बेताने ठिबकद्वारे कांदा लागवड करण्याचा संकल्प सोडला. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत वरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके व तणनाशकांचा पुरवठा प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला. प्रकाश गोरे यांनी खरिपातील कांदा लागवडीसाठी २० जूनपासून रोपे तयार करण्याचे काम हाती घेतले. जवळपास ४० दिवसांचा अवधी उलटल्यानंतर रोप लागवडीयोग्य झाले. आता प्रत्यक्ष कांदा लागवड सुरू केली आहे. अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रावर प्रकाश गोरे दोन वर्षांपासून ठिबक सिंचनाद्वारे कांद्याचे उत्पादन घेत आहेत. बेड पद्धतीने वाफे तयार करून त्यावर ठिबक सिंचन अंथरले आहे. मागील वर्षांत त्यांनी एवढय़ा कमी जमिनीवर १३ टन कांद्याचे उत्पादन घेतले. त्यातून एक लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याचे गोरे यांनी सांगितले. त्यासाठी केवळ १५ हजार रुपये खर्च आला.
अपसिंगा येथील दीपक धुळाप्पा तोडकरी, जगदीश पलंगे, गोपाळ घोलकर, संजय पाटील या शेतकऱ्यांनीही ठिबक सिंचनाद्वारे कांद्याची लागवड करण्याचे ठरविले आहे. तुळजापूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधवर, पर्यवेक्षक एच. एस. गायकवाड, कृषी अधिकारी व्ही. पी. कुलकर्णी व कृषी सहायक नवनाथ आलमले यांच्याकडून ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत कांदाउत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा