* बोगस बियाण्यांमुळे पिकांवर मर रोग
* लाखोंच्या हानीने शेतकरी हवालदिल
* धामणगाव बढे परिसरात विदारक चित्र
    मक्याच्या भरघोस उत्पादनाचे शेतकऱ्यांना गोंडस आमिष देणाऱ्या धान्य सिड्स व गोदरेज कंपनीचे मका बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने मका पिकावर मर रोग आल्याची तक्रार धामणगाव बढे परिसरातील असंख्य मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या बियाण्यांमुळे उत्पन्न येण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतजमीन पडिक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धान्य व गोदरेज कंपनीच्या मका वाणाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली. परंतु, महिन्याभरातच या पिकांवर मर रोग पडला आहे. मशागत व पाऊस पाणी चांगला असतांनाही ही पिके पिवळी पडू लागली आहेत. मक्यापासून उत्पन्न येण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आता पेरणीचे दिवस निघून गेल्यामुळे दुसऱ्या पिकाचीही पेरणी करता येत नाही. त्यामुळे जमीन पडिक पडणार असल्याचे चित्र आहे. निकृष्ट व बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत  आहे.
गेल्या वर्षीच्या दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीकडे पाठ फिरवून कमी खर्च व अधिक उत्पादन असलेल्या सोयाबीन व मका पिकांना अग्रक्रम दिला. विविध मका बीज उत्पादक कंपन्यांनी भपकेबाज जाहिराती व प्रचार करून शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून लाखोंनी गंडविले आहे.
धामणगाव बढे येथील शेतकरी मधुकर सूर्यभान सोनोने, अशोक सुखदेव घोंगडे, संदीप घोंगडे, नामदेव विठोबा लहासे, हरी लहासे, उषा अहेर, राजेंद्र मोरे व चंद्रभान घोंगडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी धान्य सिड्स कंपनीचे ८२५५ व गोदरेज कंपनीचे १०५ या वाणाचे मका बियाण्यांची हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. परंतु, हे बियाणे बोगस निघून त्यांची उगवण क्षमताही अत्यल्प असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर महिन्याभरातच या पिकाला मर रोग लागला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मका पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
बीज उत्पादक बियाण्यांची उगवण क्षमता, त्यावर होणारे रोग व त्यावरील उपाय, किती दिवसात उत्पन्न व उत्पादन क्षमता, याची कृषीतज्ज्ञांमार्फत चाचणी होत असते. बियाण्यांचे बीज प्रमाणिकरण संस्थेकडून उगवण क्षमतेचे प्रमाणपत्र आल्यानंतर ते बाजारात विक्रीस येते. असे असतांनाही या कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने श्ेातकरी हवालदिल झाला आहे.
पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर आता शेतकरी पर्यायी पीकही पेरू शकत नाही. त्यामुळे त्याला कपाळावर हात मारण्याची पाळी आली आहे.
निकृष्ट व बोगस बियाणे पुरविणाऱ्या धान्य व गोदरेज कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषिविकास विभागाकडे संपर्क केला असता संबंधित तक्रारीची सखोल चौकशी करून त्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात शेतकरी ग्राहक मंच किंवा न्यायालयात नुकसान भरपाई मागू शकतात, असे हे अधिकारी म्हणाले. मात्र, कृषिखात्याच्या स्तरावर संबंधित कंपनी दोषी आढळल्यास कंपनीवर फौजदारी व नुकसान भरपाईची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा