पावसाळा संपल्यानंतर पहाटे फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते. रम्य शांतता, गारवा आणि दूरवर पसरलेल्या धुक्यातून जाण्यासाठी सकाळी सकाळी झोपेतून उठण्याचे कष्ट अनेकजण घेतात. आरोग्यासाठी फिरायला जाणे चांगलेही असते. मात्र मुंबईत सध्या पसरलेले धुके आरोग्यदायी नसून उलट आजारांना निमंत्रण देणारे आहे.
थंडीसोबत धुके येते. मात्र सध्या मुंबईत पसरलेले धुरके थंडीमुळे नसून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हेलेन चक्रीवादळामुळे आहे. या वादळाच्या प्रभावामुळे सध्या ढगाळ वातावरण झाले असून हवेतील बाष्पाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचवेळी आता वाऱ्यांनीही दिशा बदलली आहे. समुद्राच्या दिशेने येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईची हवा स्वच्छ होत असे. मात्र आता उत्तरेकडून जमिनीवरून तुलनेने कमी वेगाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे इतरवेळी शहरात तयार होणारे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड असे हानिकारक वायू हवेच्या खालच्या थरातच अडकून राहत आहेत. धूळ आणि हे वायू यांच्यामुळे गेले तीन दिवस हवेची दृश्यमानताही कमी झाली आहे. सगळीकडे धूर आणि धुके यांचे मिश्रण दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी दिसणाऱ्या धुक्याची गल्लत करून अनेकजण या धुरक्याचा आस्वाद घेण्यासाठी भल्या पहाटे बाहेर पडतात. मात्र अलर्जी पटकन होत असल्यांना डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील वातावरणात प्रदूषण असतेच. मात्र सध्याच्या वातावरणामुळे हानिकारक घटकांची पातळी वाढली आहे. त्यामुळे अ‍ॅलर्जीचा होत असलेल्या व्यक्तींना या काळात अधिक त्रास होतो. ‘कफ, ताप असे संसर्गजन्य आजार झालेली माणसे सकाळी फिरायला गेली की श्वासोच्छवासात अडथळे येणे, धाप लागणे अशा घटना सामान्यत: दिसून येत आहेत. वेगाने चालत असल्याने अधिकाधिक हवाही शरीरात घेतली जाते व त्याचा त्रास जाणवतो,’ अशी माहिती नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश बोराडे यांनी दिली. प्रतिकारक्षमता जास्त असलेल्या व्यक्तींना या प्रदूषणाचा लगेच त्रास होत नाही. मात्र याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. कार्बन- नायट्रोजन ऑक्साइड श्वसननलिकेत आणि फुप्फुसात गेल्यानंतर त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. त्याचे परिणाम काही वर्षांनी दिसतात. काही वेळा फुप्फुसाचा काही भाग काम करत नाही. काही वेळा कॅन्सर होण्यासाठीही प्रदूषण कारणीभूत ठरते, असेही डॉ. बोराडे म्हणाले.