नेटबँकिंगच्या व्यवहारासाठी मोबाईलवर पाठवण्यात येणारा ‘पासवर्ड’ हा खूपच सुरक्षित मार्ग असल्याचा समज आता खोटा ठरला आहे. मोबाईल क्रमांकावरील कॉल, एसएमएस दुसऱ्या क्रमांकावर वळवून एका ‘आयआयटी अभियंत्यां’च्या बँक खात्यातून तब्बल पावणेदोन लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीसही या प्रकाराने चक्रावून गेले आहेत.
कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या चिन्मय दास (३५) या अभियंत्याला नेटबँकिंगच्या माध्यमातून झालेल्या सायबर क्राइमचा फटका बसला आहे. १५ नोव्हेंबर २०१२ रोजी आपल्या मोबाईलवर ‘नो नेटवर्क’ असा संदेश येत असल्याचे दास यास जाणवले. त्यामुळे त्याने दुसऱ्या मोबाईलमध्ये ‘सिम कार्ड’ टाकले तरीही काही उपयोग झाला नाही. आपले सिमकार्ड खराब झाल्याचे वाटून दास याने मोबाईल सेवा कंपनीच्या कॉल सेंटरकडे याबाबत तक्रार केली असता, तुमच्या मोबाईल क्रमांकावरील कॉल, संदेश अन्य एका क्रमांकावर वळवण्यात आले (डायव्हर्ट) असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे तो चकित झाला आणि ती प्रक्रिया रद्द करण्याची सूचना त्याने मोबाईल कंपनीच्या प्रतिनिधीला दिली. त्यात तीन तास गेले आणि जेव्हा दासचा मोबाईल पुन्हा सुरू झाला तेव्हा ‘तुमच्या खात्यातून पावणे दोन लाख रुपये राजस्थान, गाझियाबाद येथील एकूण सहा खात्यांत वळवले गेले आहेत’ असे संदेश दासच्या मोबाईलवर आले. नंतर बँकेकडून खात्यातील व्यवहारांचा तपशील आल्यावर दास याने समता नगर पोलिस ठाण्यात फिर्याद केली.
पोलिसांनी या व्यवहारांचा तपास केला असता ही रक्कम बबली शहा, बाला जैन, तलाकिश डी., सुधा दळवी या रोजंदारीवर काम करणाऱ्या अशिक्षित मजुरांच्या खात्यांवर जमा झाल्याचे आढळले. ‘आझादी बचत योजना’अंतर्गत आधार कार्डचा वापर करून शून्य शिल्लक ठेवण्याची मुभा असलेले बँक खाते या टोळक्याने उघडले होते. त्या खात्यांमध्येच दास यांच्या बँक खात्यातून रक्कम वळवण्यात आली होती, असे समजते.
सुधा यांना इंग्रजी येत नव्हते पण त्यांच्या कागदपत्रांवरील सह्या मात्र इंग्रजीतील होत्या, असेही समोर आले. कागदपत्रांवर देण्यात आलेले पाच मोबाईल क्रमांक खोटे होते. एका क्रमांकाचा माग घेतला असता, तो सुरू असल्याचे व तो दिल्लीतील मयूर विहार भागातील हिल्टन हॉटेलमधून वापरात होता असे आढळले. पोलिसांचे पथक तेथे पोहोचल्यावर यांग क्विंद नावाचा चिनी नागरिक तेथे राहत होता आणि त्याने हॉटेलच्या पत्त्यावर स्थानिक सिमकार्ड घेतले होते अशी माहिती पुढे आली.
हा आर्थिक गुन्हा एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे व त्यात काही भारतीय सामील आहेत, असा आम्हाला संशय आहे. या प्रकरणात आम्ही सायबर क्राइम विभागाची मदत घेत आहोत, असे  समता नगरचे पोलिस निरीक्षक एल. जी. शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader