पशुधन ही राज्याची खरी संपत्ती आहे. तिचे अधिक चांगल्या पद्धतीने जतन करण्यासाठी गोकुळ दूधसंस्थेने गोठीत वीर्यमात्रा केंद्राची केलेली उभारणी पथदर्शक आहे. १८ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प गोकुळ सहकारी संस्था उभी करत असल्याने प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून भरीव निधी मिळवून देण्यात येईल, असे मत राज्याचे सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे बोलतांना केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेच्या वतीने कात्यायनी पार्क येथे १७ एकर जागेमध्ये गोठीत वीर्यमात्रा केंद्राचा (फ्रोजन सिमेन्स स्टेशन) भूमिपूजन समारंभ कात्यायनी पार्क येथे पार पडला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
राज्यात ६८ दूध उत्पादक संघ आहेत. त्यातील २२ बंद पडले असून उर्वरित सरकारी मदतीवर चाललेआहेत. जे दोन-तीन संघ उत्तम रीत्या प्रगती करीत आहेत. त्यामध्ये गोकुळ दूध संघाचा क्रम वरचा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून सहकारी मंत्री पाटील म्हणाले, या संस्थेने दूध उत्पादक शेतक ऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये आता गोठीत वीर्यमात्रा केंद्राचा नव्याने समावेश होत आहे. या माध्यमातून राज्य शासनाची जबाबदारी गोकुळ स्वतहून पार पाडत आहे. यामागे जातिवंत जनावरे व दर्जेदार दुधाची निर्मिती व्हावी, असा व्यापक हिताचा विचार आहे. असा प्रकल्प गोकुळ स्वखर्चाने करीत आहे. मात्र या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासन या प्रकल्पाच्या पाठिशी ठामपणे उभे राहील.
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्वागत केले. त्यांनी १७ एकर जागेतील १८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील म्हणाले, कोल्हापुरात गोकुळ हा एकमेव दूध संघ टिकून आहे. बाकीचे दूध संघ संपण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील इतर दूध संस्थांमध्ये पशुखाद्य जादा दराने दिले जाते. पण गोकुळने शेतक ऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन कमी दरामध्ये पशुखाद्य पुरविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे, असा उल्लेख करून त्यांनी आपले राजकीय स्पर्धक संपतराव पवार यांच्या गोकुळविषयीच्या आंदोलनाला टोला लगावला. कार्यक्रमास गोकुळचे संचालक, अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी आभार मानले. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आमदार महादेवराव महाडिक हे अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा सुरू होती.
खरे कोल्हापुरी पालकमंत्री
सत्कारावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतच कोल्हापुरी पद्धतीचा फेटा बांधला. त्यावरून पालकमंत्री हे खरेखुरे कोल्हापुरी बनले आहेत, अशी टिपणी सूत्रसंचालकांनी केल्यावर टाळ्यांचा गजर झाला. तर हर्षवर्धन पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. भूमिपूजनाच्या वेळी मंत्री पाटील यांनी पाच वेळा टिकाव मारला. त्या प्रत्येकाचे २ कोटी रुपये प्रमाणे मदत मिळावी, अशी मागणी उपस्थितांमधून झाली. त्याचा उल्लेख करून इतके पैसे द्यावे लागले असते तर एकच टिकाव मारला असता असा उत्तर पाटील यांनी दिले आणि सर्वत्र हशा पसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा