शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान २४७ घटना घडल्या होत्या. यंदा याच कालावधीत तब्बल ४११ घटना घडल्या असून साखळीचोरांनी ज्येष्ठ महिलांनाच टार्गेट केले असून सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना या सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान घडल्याचे दिसून आले आहे.
शहरातील सर्व भागांतच सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक घटनांची नोंद कोथरूड व सहकारनगर भागात, त्यापाठोपाठ वारजे, दत्तवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.
२०११ मध्ये २९६ सोनसाखळी चोऱ्या झाल्या. २०१२ या वर्षांत त्यांचा उच्चांक झाला. जानेवारीपासून ऑक्टोबरअखेर शहरात सोनसाखळी चोरीच्या ४११ घटनांची नोंद झाली. त्यातील ११० घटना उघडकीस आल्या आहेत. सोनसाखळी चोरीच्या १३२ घटनांमध्ये साठपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांचे सोने चोरले आहे. तर पन्नास ते साठ वयोगटातील ९१ महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावले आहे.
चेन स्नॅचिंग विरोधी पथकाडून दोन सोनसाखळी चोरांना अटक
शहराच्या विविध भागांत सोनसाखळ्या चोरणाऱ्या बापू उर्फ मोहन दशरत विरकर (वय ३२, रा. पाटेवाडी, जि. अहमदनगर) आणि विनोद उर्फ पप्पू वामन हळंदे (वय २६, रा. दारवली, ता. मुळशी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  गुन्हे शाखेचे कर्मचारी बाबा दगडे व राजू केरडे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी सापळा रचून ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना अटक केली आहे.