कर भरण्यासाठी थांबलेल्या व्हॉल्व्हो बसमधील मुंबईच्या सराफ व्यापा-याचे सुमारे २६ लाख ५६ हजार रुपयांचे सोन्याचे ९६५.२१० गॅ्रम दागिने अज्ञाताने लंपास केले. व्यापा-याने आपल्या बॅगेतील दागिन्यांची पिशवी नेत असल्याच्या संशयावरून दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेजण पळून गेल्याचे व्यापा-याने पोलिसांना सांगितले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कागल येथील आरटीओ नाक्यावर घडली असून, याबाबत रविवारी सराफ व्यापारी सुभाष भिकमचंद्र जैन (वय ४५, रा. चिंचपोकळी, मुंबई) यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली.    
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मुंबईचे सराफ व्यापारी सुभाष भिकमचंद्र जैन हे मंगलूरला सोन्याच्या चेन व इतर दागिन्यांचे सॅम्पल घेऊन आले होते. तेथील व्यापा-यांना सॅम्पल दाखवून मंगलूरच्या एसआरएस ट्रव्हल्सच्या व्हॉल्व्हो बसने  केए ०१-एसी १९९३) मुंबईकडे निघाले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बस कागल आरटीओ नाक्यावर कर भरण्यासाठी थांबली. त्या वेळी जैन यांना जाग आली असता दोन इसम त्यांच्या बॅगेतील पिशवी घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे पळून गेले. जैन गाडीतून खाली आले त्या वेळी ते दोघे बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. बसमध्ये पुन्हा येऊन जैन यांनी बॅग तपासली असता बॅगेतील ९६५.२१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या दागिन्यांची किंमत २६ लाख ५६ हजार ८७६ रुपये होते. पळून गेलेल्या दोन इसमांचे आणखी साथीदार बसमध्ये असतील आणि त्यांच्यापासून आपणास धोका आहे असे समजून घाबरून जैन यांनी ही घटना कोणालाही न सांगता मुंबईला निघून गेले. काल रात्री उशिरा त्यांनी कागल पोलिसात येऊन तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास उपनिरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत.

Story img Loader