देशात दिवाळीला सोने, चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असून हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी अधिक आहे. ग्राहक पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे वळला आहे. वस्तूंमध्ये ग्राहकांना विविधता हवी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या परिस्थिती सामान्य असल्याने डिसेंबपर्यंत सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी मांडला आहे.
बँकांचे व्याजदर कमी असल्याने ग्राहक सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. यात गुंतवणूकदारांना मोठा परतावाही मिळत आहे. सोने, चांदीचे दर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेनुसार कमी-जास्त होतात. दिवाळीच्या निमित्ताने सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त केली जाणारी शक्यता केवळ एक अफवाच आहे. सध्या तरी सराफा बाजाराची स्थिती अगदी सामान्य आहे. डिसेंबपर्यंत सराफा बाजारपेठेत मोठी भाववाढ अपेक्षित नाही. पुढील वर्षी जानेवारीनंतरच सराफा बाजारपेठेत बदल होण्याचा अंदाज बटुकभाई ज्वेलर्सचे भागीदार किशोर शेठ यांनी मांडला.
धनोत्रयोदशीला छोटय़ा ग्राहकांनाही सोने खरेदी करता यावे, म्हणून सराफा दुकानदारांनी २५० मिलीग्रॅम वजनाचे नाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. ग्राहकांसाठी सोने खरेदीची सोय विविध बँकांनीही उपलब्ध करून दिली आहे. बँकांकडून खरेदी केलेले सोन्याचे नाणे विकताना ग्राहकांना सराफा व्यापाऱ्यांकडेच जावे लागते. अलीकडच्या काळात सोन्याचे दागिने ‘बीएसआय’ मार्किंग असल्याने त्याची पुनर्विक्री करताना आता घट होत नाही. गेल्या पाच वर्षांत सोन्याचे भाव तिपटीने वाढले आहेत. गेल्या वर्षांच्या ऑक्टोबरमध्ये सोन्याचे भाव २४ हजार रुपये प्रतितोळा होते. सोने आता ३१ हजापर्यंत पोहोचले असून चांदीनेही ६० हजारांचा टप्पा गाठला आहे. अधिक वजनाचे अलंकार वापरणे दिवसेंदिवस कमी होत चालले असून हलक्या वजनाचे अलंकार खरेदी करण्याकडेच ग्राहकांचा अधिक कल आहे, असे त्रिभूवनदास ज्वेलर्सचे पराग पारेख यांनी सांगितले.
सध्या सराफा बाजारपेठेत बहुतांशी दुकानदारांनी ‘डिपॉझिट स्कीम’ सुरू करून ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेत सहभागी ग्राहकांना दुकानदार ‘बोनस’ देत असल्याने छोटय़ा ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशिष्ट रकमेच्या खरेदीवर काही व्यावसायिकांनी ग्राहकांना भेट वस्तू देण्याचेही जाहीर केले आहे.

Story img Loader