दीपावली म्हणजे अंधाराला दूर सारणारा प्रकाशाचा उत्सव. प्रकाशाच्या वाटेवर जाताना आनंदाची प्रत्येकाची दालने वेगळी. हा सण आला, की मिठाई, कपडे खरेदी, दिवाळीचा फराळ, मराठी मनाला साद घालणारे दिवाळी अंक अशा कितीतरी गोष्टी. पणत्यापासून ते सोन्यापर्यंत बाजारपेठेत खरेदीची लगबग आहे. एवढी, की पाय ठेवायलाही जागा नाही.
दुकान कपडय़ाचे असो की सोन्याचे, सध्या व्यापारात मोठी चलती आहे. मंदीला दूर सारत या वर्षी औरंगाबादेत चारचाकी गाडय़ांची मोठी खरेदी झाली. त्यात ‘ऑडी’ला चांगलीच मागणी होती. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदीही मोठय़ा प्रमाणात होते.
उद्या (मंगळवारी) लक्ष्मीपूजनानिमित्त सोने खरेदीत तेजी असणार आहे. तथापि, सोन्याचे नक्की दर किती, हा प्रश्न धनत्रयोदशीच्या दिवशी चांगलाच चर्चेत होता. शहरातील पाच प्रमुख सुवर्णकारांनी अनेक ग्राहकांना सोन्याचे वेगवेगळे दर सांगितले. रविवारी ३२ हजार २०० रुपये तोळा असा असणारा सोन्याचा दर सोमवारी ३२ हजार ५०० असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले, तर काहींनी ३२ हजार ४५० एवढा असल्याचे सांगितले. काही दुकानदारांनी सोन्याचा आजचा दर ३२ हजार ८०० रुपये असल्याचेही सांगितले. २४ कॅरेट सोन्याचा दर नक्की किती, असा प्रश्न काही चिकित्सक ग्राहकांनी उपस्थित केला. वास्तविक, मुंबईतून दिवसातून एकदाच सोन्याचे दर ठरविले जातात. मात्र, औरंगाबाद शहरात रस्त्याची दिशा बदलली, की वेगवेगळे दर सांगितले जातात. अनेक ग्राहकांनी खरेदीच्या पावत्याही दिल्या नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पावती देण्यापूर्वी व्हॅटची भीती मात्र आवर्जून दाखविली जाते. पावती हवी असेल तर व्हॅट भरावा लागेल, अधिक पैसे जातील, असे सांगून सुवर्णकार व्यवहारच दडवत असल्याचे अनेक ग्राहकांच्या लक्षात आले. चांदीच्या दरात तफावत आहे.     
दिवाळी अंकांची मेजवानी
शहरात बहुतांश चर्चेत असणारे दिवाळी अंक उपलब्ध झाले आहेत. मात्र, काही दर्जेदार दिवाळी अंकांची अजूनही प्रतीक्षा आहे. येत्या दोन दिवसांत ते मिळतील, असे सांगितले जाते. दीपावलीसाठी घरात फराळाचे पदार्थ बनवण्याऐवजी ते आयते खरेदी करण्याकडेच गृहिणींचाही कल आहे. शंकरपाळी, चकली असे पदार्थ आता बारा महिनेही उपलब्ध असल्याने दिवाळीतील फराळाचे नावीन्य तसे राहिले नाही, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होते. कपडे खरेदी व घरात मोठय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी धूम आहे. पैठणगेटपासून ते गुलमंडीपर्यंत जाण्यासाठी अक्षरश: वाट काढावी लागते. दीपावलीनिमित्त उद्या लक्ष्मीपूजनाच्या तयारीत व्यापारी गुंतले आहेत.

Story img Loader