सहकारनगर, पाषाण, बालेवाडी, विश्रांतवाडी, स्वारगेट, दत्तवाडी, कोथरूड, कोंढवा या भागात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून धनकवडी येथे अटक केली. या चोरटय़ांजवळ सुमारे १३ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज मिळाला असून या प्रकरणी गुलटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका सराफालाही अटक करण्यात आली आहे. या चोरटय़ांचे सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.
रोहन सुभाष चव्हाण उर्फ दुध्या (वय – २५, रा. सोमवार पेठ) व इरफान जलाउद्दीन शेख (वय – २५, रा. कमेला, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत, तर नरेश मांगीलाल सोळंकी (रा. रुणवाल पार्क, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या सराफाचे नाव आहे. या शिवाय मोहन पुखराज ओसवाल (बालाजीनगर, धनकवडी) या सराफावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुध्या याच्याविरूद्ध जबरी चोरी, दरोडा तयारी, वाहन चोरी असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत, तर इरफान याच्याविरूद्ध जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे २५ गुन्हे दाखल असून तो हवेली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी आहे. तो अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती सोळुंके यांनी दिली. ओसवाल व सोळंकी या दोघांनी चोरीचा ऐवज विकत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी संतोष पागार व संदीप पाटील या दोघांना हे आरोपी तीन हत्ती चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेले सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे उघडकीस आले. या आरोपींकडून आणि सराफांकडून दागिने वितळवून तयार केलेल्या सोन्याच्या लगडी, चार दुचाकी वाहने, घरफोडीच्या गुन्ह्य़ातील एलसीडी टीव्ही, कॅमेरा, डीव्हीडी असा अकूण १३ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सोळंकी याला यापूर्वीही अटक
गुलटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सोन्याचे दुकान चालवणाऱ्या नरेश सोळंकी या सराफाला घरफोडीच्या गुन्ह्य़ातील
सोन्याचा ऐवज विकत घेतल्या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी २०१० मध्ये अटक केली होती. तो बेकायदा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत असून अनेक गरीब नागरिकांना लुबाडले असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.    

Story img Loader