‘मंदारमाला’ नाटकाचा सुवर्णमहोत्सव तुम्ही आज साजरा करीत आहात. पण माझ्या दृष्टीने ‘मंदारमाला’च्या आजवर झालेल्या शेकडो प्रयोगांतील प्रत्येक क्षणच सुवर्णमयी होता,’ असे भावोत्कट उद्गार कै. विद्याधर गोखलेलिखित ‘मंदारमाला’ नाटकामध्ये खलनायक मदनगोपाळची भूमिका गाजविणारे ज्येष्ठ गायक अभिनेते प्रसाद सावकार यांनी काढले. १९६३ साली गुढीपाडव्याच्या दिवशी विद्याधर गोखल्यांचे ‘मंदारमाला’ हे नाटक रंगभूमीवर आले, त्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रंगशारदा प्रतिष्ठानतर्फे ‘सूर तेच छेडिता’ हा ‘मंदारमाला’ नाटकाच्या आठवणी जागवणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शुभदा दादरकर यांनी अभिनेते प्रसाद सावकार यांच्याशी ‘मंदारमाला’संदर्भात मारलेल्या मनमोकळ्या गप्पांत त्यावेळच्या अनेक हृद्य क्षणांना त्यांनी उजाळा दिला.
‘मंदारमाला’मध्ये व्रतस्थ गायक मंदारची प्रमुख भूमिका समरसून करणाऱ्या पं. रामभाऊ मराठे यांचेही या नाटकाच्या यशात प्रचंड योगदान असल्याचे प्रसाद सावकार यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्याशी या नाटकात दरबारी गायक म्हणून संगीतातून झुंजायला आणि शेवटी हरायलाही मला मोठीच मौज येत असे, असे सांगून सावकार पुढे म्हणाले की, गोखल्यांनी मला ती भूमिका दिली होती ती गमतीजमती करायलाच! मीही त्याचा फायदा उठवून धमाल करत असे. परंतु रामभाऊंचा मोठेपणा हा, की मी त्यांना झाकोळू पाहतो आहे असं त्यांनी कधीही मानलं नाही. हे नाटक आधी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे रंगभूमीवर आलं होतं. पण थोडय़ा प्रयोगांनंतर काही कारणांमुळे ते बंद पडले. तेव्हा निर्माते राजाराम शिंदे यांनी ते घेतलं. त्यावेळच्या पहिल्याच प्रयोगाचं बुकिंग त्याकाळी ३० हजार रुपये इतकं भरघोस झालं होतं. त्यानंतर ‘मंदारमाला’चे शेकडय़ाने प्रयोग झाले. या नाटकाच्या घवघवीत यशामुळेच राजाराम शिंदे यांना आपल्या नाटय़संस्थेचं नामकरण ‘नाटय़मंदार’ असं करावंसं वाटलं. या नाटकाने त्यांना आमदारकीही मिळवून दिली.
या दिलखुलास मुलाखतीनंतर प्रा. सुरेश महाजन यांनी लिहिलेला आणि विजय गोखले यांनी दिग्दर्शित केलेला ‘सूर तेच छेडिता..’ हा ‘मंदारमाला’ नाटकाचे कथासूत्र निवेदनातून उलगडत असतानाच त्यातील सर्व लोकप्रिय पदे कलाकारांच्या संचात सवेष आविष्कारित करणारा आगळा कार्यक्रम सादर झाला. सुरेश बापट, संजीव मेहेंदळे, गौरी पाटील, भक्ती भाटवडेकर, यतीन ठाकूर आणि विजय गोखले हे कलाकार त्यात सहभागी झाले होते. ऑर्गनवर मकरंद कुंडले आणि तबल्यावर धनंजय पुराणिक यांनी साथसंगत केली. ‘मंदारमाला’चे प्रयोग ऐन बहरात असताना ते पाहिलेल्या जुन्या प्रेक्षकांना स्मृतिरंजनाचा आनंद देणारा आणि ते पाहू न शकलेल्या आजच्या पिढीला ‘मंदारमाला’शी परिचित करून देत त्यातल्या सुमधुर गाण्यांची रंगत लुटू देणारा हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय व प्रेक्षणीयही झाला.
‘मंदारमाला’ची सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती
‘मंदारमाला’ नाटकाचा सुवर्णमहोत्सव तुम्ही आज साजरा करीत आहात. पण माझ्या दृष्टीने ‘मंदारमाला’च्या आजवर झालेल्या शेकडो प्रयोगांतील प्रत्येक क्षणच सुवर्णमयी होता,’ असे भावोत्कट उद्गार कै. विद्याधर गोखलेलिखित ‘मंदारमाला’ नाटकामध्ये खलनायक मदनगोपाळची भूमिका गाजविणारे ज्येष्ठ गायक अभिनेते प्रसाद सावकार यांनी काढले.
First published on: 14-04-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden jubilee year complition of mandarmala