यंदाही ऐन उन्हाळ्यात जीवन प्राधिकरण विभागाने पाणीकर वसुली अभियानाला सुरुवात केली आहे. मोठय़ा थकित करदात्यांना नोटीस बजावून नळतोडणीची सूचनाही देण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्यातच जीवन प्राधिकरणाला पाणीकर वसुलीची आठवण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
शहरात पाच हजारांवर नळजोडणीधारक आहेत. अनेक नळजोडणीधारक नियमितपणे पाणीकर देत असले तरी वर्षभर नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नेहमीच केली जाते. यासाठी जीवन प्राधिकरण पाणीकराचा थकित रकमेचे कारण पुढे करीत असली तरी, वाढत्या पाणीकराच्या थकित रकमेसाठी जीवन प्राधिकरणाचा गलथान कारभारच कारणीभूत असल्याचे दिसते. वर्षभर नियमितपणे पाणीकर वसुलीचे कोणतेही प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून होत नसून ऐन आता उन्हाळ्यातच पाणीकर वसुली अभियान राबविले जात आहे. त्यासाठी नळजोडणी काढण्याचा इशाराही दिला जातो, मात्र असे असतानाही पाणीकराची थकित रक्कम कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे.
यावर्षीही ऐन उन्हाळाच्या तोंडावर जीवन प्राधिकरणाने थकित कर वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. काही करदात्यांना नोटीसाही बजावल्याची माहिती आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठय़ा करदात्यांऐवजी सर्वसामान्य नागरिकांना या कर वसुलीचा फटका सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. खासगी नळजोडणीसह सार्वजनिक नळजोडणीवरही या अभियानांतर्गत कारवाई होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा