गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला तरीही जिल्ह्य़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपविला असून जिल्ह्य़ातील २६८ गावे व १८७ वाडय़ांना पाणीटंचाईचे तीव्र चटके बसणार आहेत.
या गावांमध्ये प्राथमिक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने एप्रिल ते जून दरम्यानच्या एकूण ४०० कामांचा आराखडा तयार केला असून टंचाई निवारणाकरिता १ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला असून जिल्ह्य़ात टंचाईची दाहकता कमी असली तरी ती मे महिन्यात जाणवू शकेल. दरम्यानच्या काळात ३ ते ४ गावांना टँंकरने सुद्धा पाणीपुरवठा करण्याची प्रशासनाची तयारी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना दिली. गोंदिया जिल्हा आश्वासित पर्जन्यमानाचा क्षेत्रात येत असल्याने पावसाची सिंचनक्षमता इतर जिल्ह्य़ाच्या तुलनेत कमी आहे. या वर्षीच्या पावसाच्या तुलनेवरून टंचाईची स्थिती काढण्यात आली. ठराविक ३ ते ४ गावांना मे महिन्यात टंॅकरने पाणी पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनवर येऊ शकते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आठही तालुक्यांचा टंचाईसदृश्य अंतिम आराखडा तयार केल्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली. मार्चच्या अखेरीस पाण्यासाठी भटकंती करण्याचे वेळ येणाऱ्या गावांची संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. जिल्ह्यातील एकूण १५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपकी केवळ ९ योजना सुरू आहेत. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.
जिल्ह्य़ातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठय़ातही बऱ्याच प्रमाणात घट झाली असून जवळपास १५० गावांमधील नागरिकांना एप्रिल, मे, जून या महिन्यात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतामानामुळे मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठय़ातही बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. तलावांची पातळी खालावल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीवर झाला आहे. जि.प.ने भूजल सर्वेक्षण विभागातंर्गत जिल्ह्य़ातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेतला असता एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात एकूण २६८ गावे व १८७ वाडय़ांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्य़ातील दुर्गम रामपुरी, लटोरी, चिचगढ-पालांदूर, चुरडी, चिरेखनी, बघोली या सहा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्याने यावर अवलबूंन असणाऱ्या १५० गावातील नागरिकांवर उन्हाळ्यात तीव्र पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकित वीज देयक व देखभाल दुरुस्तीकरिता शासनाने निधी न दिल्याने बंद पडलेल्या आहेत, तर मध्यम प्रकल्पांतर्गत येणारे कटंगी मध्यम प्रकल्प, कलपाथरी, उमझरी लघु प्रकल्प, ओवारा लघु प्रकल्पातील पाणी साठय़ात घट झाली आहे. या प्रकल्पात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सरासरी २७ पाणीसाठा शिल्लक आहे. एकंदरीत या प्रकल्पातील पाणी साठा व वाढते तापमान लक्षात घेता या वर्षी जिल्ह्य़ातील नागरिकांना  पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी डांगोर्ली येथे वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल व मे महिन्यात नदीच्या पाणी पातळीत दरवर्षीच घट होते. त्यामुळे डागोर्ली येथील वैनगंगा नदीवर जीवन प्राधिकरणतर्फे तात्पुरता बंधारा तयार करून पाण्याची पातळी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. बंधारा तयार केला नाही, तर या शहरातील नागरिकांनाही तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. तिरोडय़ात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी पुरवठा अनियमितपणे केल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील गांधी वॉर्डामधील नळांना काही दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी जीवन प्राधिकरण विभागाचे सहायक अभियंत्यांकडे केली आहे. या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी, अर्ज देऊनही नियमितपणे पाणी पुरवठा केला जात नव्हता.