फक्त १० टक्केपाणी, पावसाची प्रतीक्षा
गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या आठ दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतरही जलाशयातील पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. जिल्ह्य़ात अद्यापही बरेच प्रकल्प रिकामेच असून जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी पावसाला वेळेवर सुरुवात झाली, त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र जिल्ह्य़ातील लघु व मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेच असल्याचे दिसून येते. बाघ इटियाडोह प्रकल्पात जूनच्या शेवटी १९.२९ टक्केपाणीसाठा, सिरपूर बांध ३०.८५ टक्के, पुजारीटोला २७.२३ टक्के, कालीसराड १.९५ टक्केपाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प विभागांतर्गत कटंगी मध्यम प्रकल्पात ३.९४ दलघमी., कलपाथरी मध्यम प्रकल्पात ७.१७ दलघमी., उमरझरी प्रकल्पात ९ दलघमी., ओवारा लघु प्रकल्पात १०.५५ दलघमी पाणीसाठा आहे. सर्वच जलाशये जवळपास ९० टक्केकोरडीच आहेत.
पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या जलाशयांची स्थितीही चिंताजनक आहे. बोदलकसा मध्यम प्रकल्पात १८.५७ टक्के, चोरखमारा १२.७८ टक्के, चुलबंद ११.३७ टक्के, खैरबंदा १६.०७ टक्के, मानागड १३.०६ टक्के, रेंगेपार ९.१४ टक्के, संग्रामपूर २५.७४ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्य़ातील २० लघु प्रकल्पांमध्ये २१ टक्के पाणी साठा आहे. मालगुजारी तलावांची स्थितीही बिकट असून ३८ मालगुजारी तलावांमध्ये केवळ ३०.४२ टक्के पाणीसाठा आहे. यावर्षी जूनमध्ये चांगला पाऊस होऊनही जलाशयातील पाणीसाठय़ात विशेष वाढ झालेली नाही.
दरम्यान, अर्जुनी मोरगाव तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महागाव येथे १०० हेक्टर शेतजमिनीत संकरित भात उत्पादक प्रकल्प ‘श्री’ पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची निवड करून संकरित बियाणेसुद्धा वाटप करण्यात आले. भात पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने कृषी विभागाच्या वतीने महागाव व नवनीतपूर या दोन गावांची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. दोन्ही गावांमध्ये १०० हेक्टर क्षेत्रावर ‘श्री’ पद्धतीने भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संकरित भात बियाण्यांचे वाटप करून शेतामध्ये नर्सरी टाकण्याचे काम सुरू असल्याचे कृषी सहायक राजेश खंडाईत यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा ग्रामीण अभियानांतर्गत खरीप २०१३-१४ मधील प्रकल्पासाठी निवड झालेल्या शेतक ऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जैविक कीड, रोगनाशके, जैविक व रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतीशाळा प्रशिक्षण घेऊन रोग व निरीक्षण करून किडीचे नियंत्रण करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा